सचिन देणार अॅनिमेटेड अवतारात दर्शन

भारतीय क्रिकेटचे भूषण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लवकरच अॅनिमेशनच्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. थ्रीडी अॅक्शन, कॉमेडी आणि साहस यांनी खच्चून भरलेली ही अॅनिमेटेड सिरीयल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.शेमारू एंटरटेनमेंट आणि मून स्कूप या कंपन्यांनी ही निर्मिती केली असून ही सिरीयल २६ भागांची असल्याचे समजते.

याविषयी बोलताना सचिन म्हणतो की मीच या सिरीयलबद्दल फार उत्सुक आहे. कारण अॅनिेमेशन फिल्म मला भयंकर आवडतात आणि माझ्या मुलांसोबत अशा फिल्म मी नेहमीच पाहतो. हा एक वेगळा अनुभव आहे. स्वतःचे अॅनिमेशन पडद्यावर मला पाहायला मिळते आहे याहून आणखी मजेची गोष्ट कुठली? यात दे दणादण अॅक्शन आहे आणि त्याचाही आनंद मी लूटणार आहे कारण प्रत्यक्ष आयुष्यात अशी दे दणादण अॅक्शन करण्यात अनेक मर्यादा असतात.

सचिन यात एका इंटरनॅशनल क्रिकेट ट्रेनिग कॅम्पचा हिरो आहे आणि १२ जणांच्या चमूला तो प्रशिक्षण देताना दिसणार आहे. त्याच्या विरोधी प्रशिक्षण टीमचा हिरो आहे पीटर टेलर. सचिनच्या टीमबरोबर एक कुत्राही आहे. भविष्यकाळातील आंतरराष्ट्रीय, स्पर्धात्मक मॅचेस कशा असतील याचा विचार या अद्भूत सिरीयलमध्ये केला गेला आहे. त्यामुळे यात स्पेस शीपच्या आकाराचे स्टेडियम जे स्पेस शीपप्रमाणे उडू शकते आणि जगाच्या पाठीवर कुठेही लँड होऊ शकते तेही पाहायला मिळणार आहे.

निर्मात्या कंपनीतील अधिकारी स्मिता मारू म्हणाल्या की सचिनसोबत काम करायला मिळणे हे म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासारखे आहे. क्रिकेट हे प्रत्येक भारतीयाच्या रक्तातच असल्याने ही सिरीयल सर्वांनाच नक्की आवडेल अशी आशा आहे.

Leave a Comment