विकिलिक्स गौप्यस्फोटाच्या निमित्ताने…

काँग्रेस पक्षावर किंवा त्याच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही असा एकही आठवडा गेलेला नाही. एखादा नवा आरोप होतो आणि आता तरी आरोपांची मालिका खंडित होईल असे वाटते पण कोणत्या ना कोणत्या कोपर्‍यातून नवा आरोप होतोच. काँग्रेस पक्षाचे रेकॉर्ड स्वच्छ नसेल तर त्याच्यावर कोठून ना कोठून तरी सातत्याने आरोप होणारच आहेत. आता सगळ्या प्रकारचे आरोप संपले आहेत आणि राजीव गांधी राजकारणातही नसतानाच्या काळातला भ्रष्टाचाराचा नवा आरोप झाला आहे.

गेल्या दोन तीन वर्षात विकिलिक्स वेबसाईटच्या माध्यमातून ज्युलीयस असांजे नावाचा एक ऑस्ट्रेलीयन पत्रकार अनेकांचे वस्त्रहरण करीत सुटला आहे. त्याच्या या सपाट्यातून अमेरिकेचीही सुटका झालेली नाही. त्याच्या काही रहस्योद्घाटनांमुळे; काही देशांची परराष्ट्र नीतीची गुपिते उघड झाली आहेत आणि त्यामुळे त्यांच्या इतर देशांशी असलेल्या संबंधांवर विपरीत परिणाम होण्याची चिन्हे दिसायला लागली. म्हणून असांजे याच्यावर बलात्काराचा खोटा आरोप लावून त्याला जखडून टाकण्याचा प्रयत्न झाला. पण तो त्यात अडकला नाही. आता त्याने अमेरिकेची हजारो पत्रे आणि केबल्स प्रकाशात आणली आहेत.

सन १९७३ ते १९७६ या काळातली सुमारे २ लाख ५० हजार कागदपत्रे मिळवणे आणि त्यांची छाननी करून त्यातली काही कागदपत्रे प्रकट करणे हे काही सोपे काम नाही. या कागदपत्रात अनेक गुपिते गुंतली असणार हे तर उघडच आहे. पण त्यातली राजीव गांधी यांच्याच संबंधातले काही कागदपत्र आणि पत्रव्यवहार एका इंग्रजी दैनिकाने प्रकाशात आणले आहेत. त्यातून या दैनिकाने राजीव गांधी यांना लक्ष्य केले असून साब स्कॅनिया या स्विडीश कंपनीची काही लढावू विमाने भारताला विकायची होती तेव्हा त्या व्यवहारात राजीव गांधी यांनी मध्यस्थी केली होती. अर्थातच त्यांना त्यातून दलाली मिळाली. परंतु दलाली मिळून सुद्धा हे कंत्राट या कंपनीला मिळाले नाही, असे या कागदपत्रात म्हटले आहे. हा व्यवहार १९७५ साली झाला. तेव्हा राजीव गांधी हे राजकारणात तर नव्हतेच पण त्यांच्या राजकारण प्रवेशाबाबत काही बोललेही गेले नव्हते. तेव्हा इंदिरा गांधी या राजकारणात सर्वेसर्वा होत्या आणि त्यांचे राजकीय वारस म्हणून संजय गांधी हे सक्षमपणे कार्यरत होते.

राजीव गांधी त्या काळात विमान चालक म्हणून सेवेत होते. संजय गांधी हे राजकारणात इतके प्रभावी होते की राजीव गांधी यांची अशाप्रकारची लुडबूड चालणे शक्यच नव्हते. निदान काँग्रेसचे तरी म्हणणे असे आहे. या संबंधातले पत्रव्यवहार अमेरिकेचे गाजलेले परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर यांनी केला आहे. किसिंजर हे अमेरिकेच्या राजकारणातले मोठे प्रभावी प्रस्थ होते. खरे म्हणजे ते अमेरिकेचे अध्यक्षच व्हायचे. परंतु ते ज्यू असल्यामुळे त्या राजकारणात मागे पडले आणि परराष्ट्र मंत्रीपदावर समाधान मानावे लागले. मात्र त्यांच्या काळामध्ये ते अमेरिकेच्या राजकारणात फारच आघाडीवर होते आणि त्यांच्या एका कागदपत्रात हे रहस्य उघड झाले आहे. यात दलाली दिली गेली, पण व्यवहार झाला नाही असे म्हटलेले आहे.

ते काही का झालेले असेना परंतु भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात खुद्द राजीव गांधी यांचेच नाव दलाल म्हणून पुढे यावे ही गोष्ट निश्चितच काँग्रेससाठी खळबळजनक आहे. असे झाले असण्याची शक्यता आहे का? याचा दोन्ही बाजूने विचार केला असता काही गोष्टी समोर आल्या. कंपनीने राजीव गांधी यांची मध्यस्थी काय म्हणून स्वीकारली? ते एका व्यावसायिक विमान कंपनीचे चालक होते आणि त्या स्तरावरच्या व्यक्तीचा लढाऊ विमान खरेदी करताना सल्ला घेतला जावा ही गोष्ट शक्य वाटत नाही. राजीव गांधी काही विमानाचे तज्ज्ञ नव्हते. तसा उल्लेख या पत्रव्यवहारात सुद्धा आहे. परंतु दुसर्‍या एका पत्रात राजीव गांधी हे तज्ज्ञ नसले तरी पंतप्रधानांचे चिरंजीव आहेत आणि त्यामुळे त्यांची मध्यस्थी स्वीकारावी आणि हे कंत्राट पदरात पाडून घ्यावे असे म्हटलेले आहे.

म्हणजे या व्यवहारातली राजीव गांधी यांची मध्यस्थी असलीच तर ती पंतप्रधानांचे चिरंजीव म्हणून झालेली आहे. अर्थात व्यवहार पूर्ण झाला नाही, पण एका माजी पंतप्रधानाचे नावच दलाल म्हणून पुढे आले आणि विरोधी पक्षांनी त्याचा साहजिकच फायदा उठवला. भारतीय जनता पार्टीने हा सारा पत्रव्यवहार उघड केला जावा, अशी मागणी केली. अर्थात ही मागणी काँग्रेसकडे करणे पुरेसे नाही. कारण हा सारा उद्योग असांजे यांनी केलेला आहे. जर भारतीय जनता पार्टीला ही कागदपत्रे हवीच असतील तर ती पूर्णपणे जाहीर करण्याची मागणी असांजेकडे केली पाहिजे आणि असांजे हा काही राजीव गांधींना लक्ष्य करून काम करत नाही. तो अमेरिकेची कागदपत्रे मिळवतो आणि प्रसिद्ध करतो.

तो प्रसिद्ध करत असलेल्या कागदपत्रांना पुरावा म्हणून कितपत स्थान द्यावे हा प्रश्न नेहमीच उपस्थित होत असतो आणि आताही तो झालेला आहे. राजीव गांधी हे या व्यवहारात एजंट होते, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एका पत्रात लिहिले होते हा काही राजीव गांधींच्या भ्रष्टाचाराचा पुरावा होऊ शकत नाही. तेव्हा तेवढ्या कागदपत्रांवरून राजीव गांधी यांच्यावर आरोप करता कामा नये. मात्र मिळालेला हा सुगावा व्यर्थही घालवता कामा नये. त्याचा आधार घेऊन वाटल्यास भारतीय जनता पार्टीने अधिक संशोधन करावे हे योग्य ठरेल.

Leave a Comment