वॉशिग्टन दि.१० – पाकिस्तानात प्रवास करणे अगदी आवश्यक असेल तरच अमेरिकन नागरिकांनी तेथे जावे अन्यथा पाकिस्तानात जाऊ नये असे आदेश अमेरिकन सरकारने आपल्या नागरिकांना दिले आहेत. पाकिस्तानात अनेक परदेशी तसेच त्यांच्याच देशातील दहशतवादी गट अमेरिक न नागरिकांविरोधात हल्ले चढवित आहेत त्यामुळे अमेरिकन नागरिकांना तेथे धोका आहे असे सरकारने जाहीर केले आहे.
यू.एस स्टेट विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानात जेथे जेथे अमेरिकन अथवा परदेशी नागरिक जाण्याची शक्यता आहे तेथे दहशतवादी गट हल्याची संधी साधत आहेत त्यामुळे अमेरिकन नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. पाकिस्तानी गुप्तवार्ता विभागातील अधिकारीही अमेरिकी नागरिकांना कॉन्सुलेट बाहेर थांबवून त्यांची वैयक्तीक माहिती घेत आहेत आणि अनेकवेळा ते राहात असलेल्या ठिकाणी जाऊनही पाकिस्तानात कशासाठी आला, व्यवसाय काय अशा चौकशा करत आहेत.
परदेशी नागरिकांच्या अपहरणाच्या घटनात पाकिस्तानात लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे ज्या अमेरिकन नागरिकांना त्यांच्या जीवाला धोका आहे अशी भावना होत असेल त्यांनी त्वरीत पाकिस्तानातून बाहेर पडावे असेही आदेश स्टेट विभागाने दिले आहेत. विशेषतः ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात मारल्यापासून तेथे मोर्चे, निदर्शन केली जात आहेत आणि अनेकदा शांततेत चाललेली ही निदर्शने हिंसक वळण घेत आहेत त्यामुळे अशा ठिकाणांपासूनच अमेरिकन नागरिकांनी दूर राहावे अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत असे समजते.