वडिलांसाठी हिना रब्बानी यांची निवडणूक रिंगणातून माघार

इस्लामाबाद दि.९ – पाकिस्तानच्या इतिहासात सर्वात कमी वयात आणि पहिली महिला परराष्ट्र मंत्री बनण्याचा इतिहास रचणार्‍या हिना रब्बानी खार यांनी मे मध्ये पाकिस्तानात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतून माघार घेतल्याचे वृत्त आहे. रब्बानी यांच्या वडिलांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला गेल्याने त्यांच्यासाठी रब्बानी यांनी ही माघार घेतली आहे.

हिना रब्बानी यांच्या वडिलांना यापूर्वी निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित करण्यात आले होते व त्यामुळे रब्बानी खार यांनी त्यांच्या जागेवर दक्षिण पंजाब मधून निवडणूक लढविली होती. आता मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज मंजूर केला गेला आहे. यावेळीही कदाचित वडिलांचा अर्ज नामंजूर होईल या आशंकेनेच त्यांनी कव्हरिंग उमेदवार म्हणून निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज भरला होता.

देशाची पहिली महिला परराष्ट्र मंत्री म्हणून हिना रब्बानी यांनी २०११ साली सूत्रे हाती घेतली. त्याचवेळी वयाच्या ३४ व्या वर्षी सर्वात तरूण परराष्ट्रमंत्री म्हणूनही त्यांनी आपले नांव कोरले. रब्बानी यांच्या उच्च राहणीमानाची तसेच त्यांच्या खर्चिक स्वभावाची कायम चर्चा होत राहिली तसेच परदेशात पाकिस्तानचा ग्लॅमरस फेस म्हणूनही त्यांची ओळख आहे.

Leave a Comment