महाराष्ट्राचे मारकुटे आमदार

kadam

मनसे आमदार राम कदम आणि अपक्ष आमदार क्षितिज ठाकूर या दोघांना एका पोलीस अधिकार्‍याला मारहाण केल्याबद्दल अटक करण्यात आली. या संबंधात काही वृत्त वाहिन्यांनी चर्चा घडवताना त्यांची संभावना गुंड आमदार या शब्दात केल्याने सारे आमदार चिडले. त्यांनी या दोन वाहिन्यांच्या विरोधात हक्कभंग ठराव दाखल केला. दोन आमदार या प्रकरणात गुंतले म्हणून सर्वच आमदारांना गुंड संबोधणे ही गोष्ट सरसकट सर्व आमदारांना गुंड ठरवणारी आहे असा या ठराव दाखल करणार्यां चा दावा होता.

सगळेच आमदार तसे नाहीत आणि तसा आरोपही कोणी करणार नाही पण २८८ पैकी दोनच आमदार तसे आहेत असेही काही म्हणता येत नाही. दर सहा आमदारांपैकी एक आमदार अशा प्रवृत्तीचा आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत आता निवडून आलेल्या सुमारे ५० आमदारांनी कधी ना कधी सरकारी अधिकार्‍यावर हात टाकला असून त्यांच्यावर या संबंधात खटला दाखल झालेला आहे. अशा प्रकारात भारतीय दंड संहितेच्या ३५३ व्या कलमाखाली गुन्हा दाखल होत असतो.

२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी  उमेदवारी अर्ज भरताना या लोकांनी आपल्या अर्जासोबत  आपल्यावर दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती दिली असून त्यातल्या ५० आमदारांनी आपल्यावर या कलमाखाली गुन्हा दाखल झाला असल्याचे नमूद केले आहे. या बाबतीत (म्हणजे गुन्हे दाखल होण्याच्या बाबतीत) शिवसेना आघाडीवर आहे. कारण शिवसेनेच्या दर तीन आमदारांपेकी एक आमदार या कलमाखाली गुंतलेला आहे.

आता कदम आणि ठाकूर यांच्यावरील आरोपांची चौकशी औरंगाबाद जिल्हयातल्या वैजापूरचे शिवसेना सदस्य आर. एम. वाणी हे करीत आहेत. पण त्यांच्यावरही असे आरोप आहेत. अनेक आमदारांवर हा आरोप एक वेळा झाला आहे.  अर्थात हे आरोप मारहाणीचे नाहीत तर सरकार अधिकार्‍याच्या कामांत हस्तक्षेप करीत त्यांच्यावर दडपण आणणे असे आहेत. काही आमदारांवर दोनदा आरोप दाखल  झालेला आहे पण वाणी हे एकमेव सदस्य असे आहेत की ज्यांच्यावर असे पाच आरोप आहेत. या यादीत २० आमदार शिवसेनेचे आहेत. राष्ट्रवादीचे बीड जिल्हयातले आमदार बदामराव पंडित यांच्यावर असे चार आरोप आहेत. भाजपाचे  नेते एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगुंटीवार यांच्यासह १२ आमदारही या संदर्भात आरोपी आहेत. मनसेचे १३ आमदार निवडून आले आहेत पण त्यातले पाच आमदार या प्रकरणात गुंतले आहेत.

Leave a Comment