पुण्यात गतवर्षीचा प्रजासत्ताक दिन शोकाच्या वातावरणात पार पडला होता. कारण त्याच्या आदल्याच दिवशी संतोष माने नामक एका बस ड्रायव्हरने काही कारण नसताना पुण्याच्या भर रस्त्यावरून ४५ मिनिटे २० कि.मी. अंतर बस बेभानपणे चालवून नऊ जणांना कुचलून मारले होते, तर ३७ जणांना जखमी केले होते. त्याच्या या कृत्याची योग्य शिक्षा त्याला आता मिळाली आहे आणि पुण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी त्याला मृत्युदंड ठोठावला आहे. या संतोष माने याचा त्या नऊ जणांनी काही अपराध केलेला नव्हता. परंतु काही तरी अफाट करण्याच्या त्याच्या मनोविकृतीमुळे या नऊ जणांचे जीव गेले. त्यामुळे त्याला झालेली फाशी योग्य तर आहेच पण त्या नऊ मृतांच्या कुटुंबियांना दिलासा देणारी आहे.
बेभान कृत्याची शिक्षा
संतोष माने याने हा प्रकार केला असला तरी त्याने तो नेमका का केला याचा उलगडा अजूनही झालेला नाही. त्याला ही मृत्युदंडाची शिक्षा व्हावी की नाही यावर आता चर्चा होत राहील. किंबहुना ती सुरूही झालेली आहे. परंतु त्याने काही कारण नसताना नऊ जणांचे जीव घेतले हा अपराध फाशीच्या शिक्षेस योग्यच आहे. जेव्हा अतीशय अपवादात्मक आणि दुर्मिळात दुर्मिळ असा नृशंस अपराध केला जातो तेव्हाच फाशीची शिक्षा सुनावली जात असते. एखादी बस जाणूनबुजन बेदरकारपणे चालवून आणि तीही पुण्यासारख्या शहरातल्या मध्यवर्ती भागातून चालवून ज्यांचा काहीही संबंध नाही अशा नऊ जणांना कुचलून मारणे ही दुर्मिळच घटना आहे. अशा प्रकारचा अपराध यापूर्वी कधीही घडलेला नाही. त्यामुळे त्याला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा योग्यच आहे.
संतोष माने हा मानसिकदृष्ट्या विचलित होता आणि तो मानसोपचार करणार्याक डॉक्टरांच्या उपचाराखाली होता. त्यामुळे त्याने केलेले कृत्य हे भावनेच्या भरात आणि वेडाच्या झटक्यात केले आहे, जाणुनबुजून केलेले नाही तेव्हा त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनवावी, अशी मागणी त्याच्या वकिलाने केली होती. परंतु हा युक्तीवाद आणि ही मागणी न्यायाधीशांनी फेटाळून लावली. त्याने पूर्णपणे शुद्धीवर असताना हे काम केलेले आहे आणि आपण जे काही करत आहोत त्याचे परिणाम काय होतील याची त्याला जाणीव होती, तरीही त्याने हे काम केले आहे असे न्यायाधीशांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे.
संतोष माने याला वेडा ठरवले असते तर न्यायाधीशांनी त्याच्या बाबतीत वेगळा दृष्टीकोन स्वीकारला असता आणि त्याला फाशीची शिक्षा झाली नसती. म्हणून त्याला वेडा ठरविण्यासाठी बचावाच्या वकिलांनी खूप प्रयत्न केले. त्याशिवाय मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दिलीप बुरटे यांनी सुद्धा संतोष माने वेडा आहे, असे सिद्ध करण्यासाठी खोटी साक्ष दिली. त्यामुळे या संबंधात या डॉक्टरवर सुद्धा खटला भरला जाण्याची शक्यता आहे. जाणुनबुजून मनुष्य हत्या करण्यासाठी त्याच्यावर भारतीय दंड विधान संहितेच्या ३०२ क्रमांकाच्या कलमाखाली तर खटला भरला गेला आहेच, पण बेकायदारित्या चालवण्यासाठी बस चोरणे या आरोपाखाली ३८१ व्या कलमाखाली आणि खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल ३०७ व्या कलमाखाली अशा अन्यही कलमांखाली त्याला शिक्षा सुनावण्यात आली.
संतोष माने याने त्या दिवशी सकाळीच आगारत उभी असलेली एक बस डुप्लीकेट चावीने चालू केली आणि ती बस बेभानपणे गर्दीत नेऊन चालवली. या प्रकाराने पुण्यात मोठी खळबळ माजली होती. संतोष माने हा एस.टी.मध्ये ड्रायव्हर आहे. त्यामुळे तो डेपोत जाऊ शकला. परंतु तो कोणत्या मनःस्थितीत होता हे माहीत नाही. त्याने बस आगाराच्या बाहेर काढली आणि हा प्रताप केला. ३५ वर्षे वयाच्या संतोष माने याने हा प्रकार नेमका का केला, याबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. त्याच्या वकिलांनी त्याची बाजू मांडताना त्याची मनःस्थिती चांगली नाही हे पटविण्याचा वारंवार प्रयत्न केला.
त्याची पत्नी दोन वर्षांपूर्वी वारलेली आहे. त्यामुळे त्याची मनःस्थिती बिघडलेली होती असे त्याच्या वकिलांनी म्हटले. परंतु ही गोष्ट न्यायाधीशांना पटली नाही. कारण एक पत्नी मरण पावली असली तरी त्याने दुसरे लग्न केलेले आहे आणि त्या पत्नीला एक मुलगीही झालेली आहे. त्यामुळे या गोष्टीवरून त्याचे मनस्वास्थ्य बिघडलेले होते ही गोष्ट सिद्ध होत नाही. या प्रकारानंतर एस.टी. महामंडळाची बरीच बदनामी झाली. महामंडळाचा कारभार ढिसाळ असल्याची टीका झाली. कारभार खरोखर वाईट आहे ही गोष्ट खरीच. पण तो इतकाही खराब नाही की एखाद्या ड्रायव्हरने अशी बेभानपणे गाडी चालवून लोकांची जीवने उद्ध्वस्त करून टाकावीत.
या गृहस्थाने ४५ मिनिटे हा गोंधळ घातला आणि २० कि.मी. ही बस चालवली. अशा प्रसंगी आपतकालीन उपाय म्हणून काही असतात हे कुठे दिसलेच नाही. शेवटी शरीफ इब्राहिम कुट्टी या २० वर्षाच्या तरुणाने हा सारा प्रकार ओळखला आणि धाडसाने बसच्या केबीनमध्ये जाऊन संतोष मानेला बस थांबवायला भाग पाडले. एकंदरीत आपल्या समाजातल्या सुरक्षा व्यवस्थावर सुद्धा या प्रकाराने प्रकाश पडला आहे.
