पाक लष्कर आणि अतिरेक्यांमध्ये घमासान

इस्लामाबाद: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या कबाईली क्षेत्रातील तिराह या डोंगराळ भागातून दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने सुरू केलेल्या मोहिमेत जोरदार संघर्ष सुरू असून आतापर्यंत ९७ दहशतवादी तर ३० पाक जवान ठार झाले आहेत.

तोरा बोरा पर्वतराजीला लागून असलेला तिराह व्हॅली परिसर संरक्षणदृष्ट्या मोक्याचा आहे. या परिसरावर पाकिस्तानातील तहरिक ए तालिबान आणि लष्कर ए इस्लाम या गटाच्या दहशतवाद्यांनी आपले नियंत्रण प्रस्थापित केले आहे. या दहशतवाद्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी पाक लष्कराने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या योजनेनुसार विमाने आणि हेलिकॉप्टर्सद्वारे दहशतवाद्यांच्या तळाचा मागोवा घेऊन पायदळाची पथके त्यांचा नि:पात करीत आहेत.

या कारवाईला दहशतवाद्यांकडून कडवा विरोध होत असल्याने या ठिकाणी मोठ्या संघर्षाला तोंड फुटले आहे. दहशतवाद्यांच्या विरोधातील पाक लष्कराच्या मोहिमांपैकी ही सर्वात कठीण मोहीम असल्याचे पाक लष्कराच्या सूत्रांचे म्हणणे आहे. या मोहिमेत विशेष सेवा दलाचा एक वरिष्ठ अधिकारीही मरण पावला आहे.

Leave a Comment