पुणे दि.९ – एलबीटी लागू करण्याबाबत सरकार ठाम असल्याने आणि व्यापार्यांच्या आंदोलनाबाबत सरकार दाखवत असलेल्या अनास्थेमुळे व्यापारी संघटनांनी त्यांची चळवळ अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून येत्या २२ एप्रिलपासून व्यापारी संघटना पुन्हा एकदा बेमुदत बंद पुकारणार आहेत. फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. राज्यातील ७५० व्यापारी संघटना या बंद मध्ये सहभागी होत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी सांगितले.
गुरनानी म्हणाले की सरकार व्यापार्यांच्यासमोर अगोदरच असलेल्या अनेक अडचणींचा विचार करण्यास तयार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांत व्यापारी हित पाहणार्याय पक्षालाच मतदान करण्याचे आवाहनही व्यापारी संघटनांना करण्यात आले आहे. प्रत्येक संघटना किमान २०० मतदार यासाठी तयार करू शकते. महाराष्ट्रात नवी मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, वसई विरार येथे १ एप्रिलपासूनच एलबीटी लागू करण्यात आला असून मुंबईत तो आक्टोबर २०१३ मध्ये लागू होणार आहे. एलबीटी भरण्यास आमचा विरोध नाही मात्र सध्याच्या स्वरूपात हा कायदा आम्हाला मान्य नाही कारण त्यामुळे भाववाढ होणार आहे तसेच भ्रष्टाचार आणि सरकारी अधिकार्यांकडून व्यापार्यांची पिळवणूक होण्यास त्यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. यामुळे अनेक व्यापारी संघटनांनी महाराष्ट्र सोडून अन्य राज्यांचा आश्रय घेणे पसंत केले आहे.
महाराष्ट्र वगळता कोणत्याही राज्याने हा कर लागू केलेला नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले.