नवी दिल्ली दि.९ – मुंबई १९९३ बॉम्बस्फोट खटल्यात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षे तुरूंगवासाची शिक्षा झालेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त या शिक्षेचा पुनर्विचार केला जावा यासाठी आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. २१ मार्च रोजी संजय दत्त याला सुप्रीम कोर्टाने पाच वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती आणि चार आठवड्यांचा आत पोलिसांपुढे हजर होण्याचे आदेशही दिले होते. ही मुदत संपण्यास आता कांही दिवसांचा अवधी असतानाच ही याचिका दाखल करण्यात येत आहे.
दिल्लीतील नामवंत कायदेतज्ञांनी ही याचिका तयार केली असल्याचेही सांगितले जात आहे. त्यानुसार १९९३ च्या मुंबई स्फोट प्रकरणात संजय दत्त याने टाडा कोर्टापुढे दिलेली कबुली त्याच्या विरोधात या खटल्यात वापरता येणार नाही असे कायदेतज्ञांचे म्हणणे आहे. कारण टाडा कोर्टाने संजयला निर्दोष ठरविले होते. सध्याची केस अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणाची असल्याने ही कबुली ग्राह्य धरता येणार नाही असा वकीलांचा दावा आहे. त्यामुळे नशीब बलवत्तर असेल तर संजयची ही याचिका दाखल करून घेतली जाईल. मात्र समजा याचिका फेटाळली गेली तरी क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करता येणार आहे असे तज्ञ वकीलांचे म्हणणे आहे.
संजयची शिक्षा माफ व्हावी यासाठी देशभरातील विविध थरांतून राज्यपालांकडे अर्ज आले असले तरी संजय दत्त याने स्वतः मात्र आपण माफीसाठी अर्ज करणार नसल्याचे मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले होते. इतकेच नव्हे तर मुदत संपण्या अगोदरच आपण पोलिसांपुढे शरणागती पत्करू असेही तो म्हणाला होता.