नवी दिल्ली: पंतप्रधानांच्या भेटीसाठी राजधानीत आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना डाव्या विद्यार्थी संघटनांच्या रोषाला बळी पडावे लागले. निदर्शनकर्त्यांनी बॅनर्जी यांच्यासोबत असलेले बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांच्यावर हल्ला केल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर निदर्शकांनी आपल्यावरही लोखंडी गजाने वार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला.
या हिंसक प्रकारानंतर बॅनर्जी यांनी पंतप्रधानांबरोबरची भेट रद्द केली. केंद्राकडून प. बंगाल राज्याला २ लाख कोटी रुपयांचा निधी कर्जस्वरूपात मिळवा या मागणीवर चर्चा करण्यासाठी बॅनर्जी मंगळवारी पंतप्रधानांना भेटणार होत्या. मात्र प. बंगालमधील विद्यार्थी नेत्याच्या मृत्यूने संतप्त झालेल्या एसएफआय या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राजधानीत येताच नियोजन मंडळाच्या मुख्यालयसमोर त्यांना घेरले. आण्दोलकांनी आपल्यावर चहूबाजूंनी हल्ला केल्याचे मित्रा यांनी सांगितले.
प. बंगालमधील विद्यार्थी निदर्शनांच्यावेळी सुदीप्तो गुप्ता या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला झालेल्या डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे रुग्णालयात हलविण्यात आले. काही तासातच त्याचा मृत्यू झाला होता. मात्र या विद्यार्थ्याचा मृत्यू दुर्दैवी आहे असे सांगून बॅनर्जी यांनी त्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा इन्कार केला.
या हिंसक प्रकाराचा एसएफआयची मातृसंस्था असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह भारतीय जनता पक्षाने निषेध केला.