कोलकाता, दि.९ – कामगिरीच्याबाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर पश्चिरम बंगालच असल्याचा दावा त्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. मात्र, काँग्रेस आणि माकप या विरोधी पक्षांनी हा दावा फेटाळला आहे. दरम्यान, राज्याला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यासाठी ममता आज दिल्लीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहेत.
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी येथे पत्रकारांशी बोलताना ममता यांनी पश्चिनम बंगालच देशात आघाडीवर असल्याचा दावा केला. आम्ही कुठली भीक मागत नाही. कुठले विशेष पॅकेज देण्याचीही आमची मागणी नाही. आम्ही केवळ आमच्या हक्काचा वाटा मागत आहोत. कामगिरीचा विचार करता आमचे राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे, असे त्या म्हणाल्या. मी दिल्लीत राज्याला न्याय मागण्यासाठी जाणार आहे. पश्चिाम बंगालला हक्कापासून वंचित का ठेवण्यात येत आहे, ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे. केंद्र सरकारकडून करण्यात येणार्या राज्याच्या आर्थिक नाकेबंदीचाही निषेध करण्यात येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
राजकीय स्वरूपाच्या भेटीगाठींसाठी नव्हे तर राज्याच्या आर्थिक स्थितीसंदर्भात आपण दिल्लीला जात आहोत. पंतप्रधानांना भेटण्यापूर्वी आपण नियोजन आयोगाच्या सदस्यांची भेट घेणार आहोत. बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांच्याशी चर्चा करणार आहे. पश्चिीम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता येण्याच्या घटनेला जवळपास दोन वर्षे झाली आहेत. केंद्रीय निधीसाठी आणखी किती प्रतीक्षा करायची असे अर्थमंत्र्यांना विचारणार आहे, असेही ममता यांनी स्पष्ट केले.