दहा एप्रिलपर्यंत वकिलाती बंद करा -उत्तर कोरियाची सूचना

माद्रिद, दि. ८ – रशिया, चीन आणि ब्रिटनसह अन्य सर्व देशांनी दहा एप्रिलपर्यंत आपल्या वकिलाती बंद कराव्यात, त्यानंतर त्या देशांचे मुत्सद्दी आणि काम करत असलेल्या त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही खात्री देता येणार नाही, असा स्पष्ट इशाराच उत्तर कोरियाने देऊन टाकला आहे. दरम्यान, उत्तर कोरियाने शुक्रवारी आणखी एका मोबाईल लाँचरवर क्षेपणास्त्र तैनात केले आहे.

युरोपीय संघाच्या सदस्य राष्ट्रांकडे उत्तर कोरियाने वकिलाती बंद करण्याची योजना मांडली आहे, असे ब्रिटनच्या एका मुत्सद्याने सांगितले. व्हिएन्ना करारानुसार यजमान देशांना तेथील वकिलातीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याना देशाबाहेर सुरक्षित काढणे बंधनकारक आहे.
उत्तर कोरियाने मोबाईल लाँचरवर तैनातीसाठी क्षेपणास्त्र रेल्वेने पूर्वेकडील किनार्यांवर नेले. यापूर्वीही उत्तर कोरियाने एक क्षेपणास्त्र तैनात केले आहे. जी क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत, त्यांची उत्तर कोरियाने अद्याप चाचणीही घेतली नसल्याची अफवा आहे. दक्षिण कोरियानेही संभाव्य हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी विध्वंसक तयार ठेवले आहेत. उत्तर कोरियाच्या या कारवाईमुळे दक्षिण कोरियाच्या बाजारपेठांमध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळाले.

उत्तर कोरियाच्या आक्रमकतेमुळे अमेरिकाही सतर्क झाली आहे. दक्षिण कोरिया आणि आपल्या लष्करी तळांवर अण्वस्त्र किंवा रासायनिक अस्त्रांचा हल्ला झाल्यास त्याचा यशस्वी सामना करू शकणार्याअ लष्करी तुकड्या तैनात केल्या आहेत.

Leave a Comment