कॉलेजियन्सची धमाल कॉमेडी

बॉलिवुडमध्ये सध्या रिमेक आणि सिक्वेलची धूम सुरू आहे. यामुळेच साजिद खानच्या ‘हिम्मतवाला’ पाठोपाठ डेव्हीड धवन दिग्दर्शित ‘चष्मेबद्दुर’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गोविंदाबरोबर डेव्हीड धवनने अनेक हिट चित्रपट दिले. सलमान आणि गोविंदाबरोबर त्याचा शेवटचा हिट चित्रपट ‘पार्टनर’ होता. मागील वर्षी आलेला ‘रास्कल’ चित्रपटाच्या व्याख्येत बसणारा नव्हता. ‘चष्मेबद्दुर’ च्या माध्यमातून मात्र डेव्हीडने यशस्वी पुनरागमन केले आहे.

ऐंशीच्या दशकात सई परांजपे दिग्दर्शित ’चष्मेबद्दूर’ मध्ये फारूक शेख, दीप्ती नवल, राकेश बेदी आणि रवी वासवानी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. रसिकांच्या मनावर आजही या चित्रपटाचे गारूड कायम आहे. ’चष्मेबद्दूर’ ही तीन मित्रांची गोष्ट आहे, ज्यामधील सिद्धार्थ ( अली जाफर) सज्जन आहे तर ओमी ( देवांशु शर्मा) आणि जय (सिद्धार्थ) हे दोघे दिसेल त्या मुलीवर प्रेम करणार्‍यांच्या कॅटेगिरीमधले आहेत. या दोघांचे एकाचवेळी सीमा (तापसी पन्नु) नावाच्या मुलीवर प्रेम जडते. त्या दोघांनाही सीमा भाव देत नाही. मात्र त्या मुलीला पटवल्याची ते शेखी मिरवतात.

सीमाच्या वडिलांचीइच्छा आहे की सैन्यातील मुलाशी तिचे लग्न व्हावे कारण ते सैन्यात आहेत.
दुसरीकडे तिचे काका एखाद्या साध्या सज्जन मुलासोबत लग्न व्हावे यासाठी प्रयत्न करतात. दरम्यान सीमा आणि सिद्धार्थ एकत्र येतात आणि त्यांना वेगळे करण्याचे उद्योग त्यांचे मित्र करतात.

जुन्या चित्रपटाचा रिमेक असल्याने सई परांजपे दिग्दर्शित चित्रपटाशी याची तुलना होणे स्वाभाविक आहे. मूळ चित्रपट सई परांजपे यांनी ज्या पद्धतीने हाताळला आहे त्याला तोड नाही. अभिनयाच्या बाबतीतही तो चित्रपट दर्जेदार होता यात शंका नाही. डेव्हीड धवन दिग्दर्शित चित्रपटाची तुलना
करण्यापूर्वी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की मुळ चित्रपटाचे तीन मित्र आणि एक मुलगी हे कथासूत्र वापरले आहे आणि त्याला पूर्णपणे वेगळी ट्रीटमेंट दिली आहे. हा पूर्णपणे युवावर्गाला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेला चित्रपट आहे. साजिद – फरहाद यांनी लिहिलेले संवाद
कॉलेजियन्सची मने जिंकणारे आहेत.

अलि जाफर, सिद्धार्थ, देवांशु शर्मा यांचा अभिनय फारूख शेखच्या तोडीचा नसला तरी तिघांची जुळलेली टायमिंग आपल्याला बांधून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. या तिघांची धमाल कॉमेडी एक्सप्रेस मध्यंतरापर्यंत कायम आहे. या ‘चष्मेबद्दूर’ मध्ये काही नवीन पात्रांची भर टाकण्यात आली आहे. यामध्ये अनुपम खेरचा डबल रोल, ऋषी कपूर – लिलेट दुबेची मिडल एज लव्हस्टोरी असे
नाविन्य आहे. ऋषी कपूरने केलेली म्हणींची मोडतोड या कॉमेडीत भरच टाकते.

या चित्रपटाचा प्लस पॉइंट हा आहे की, या चित्रपटाची कथा जुन्यापेक्षा वेगळी असली तरी प्रेक्षकांना निराश करत नाही. अली जाफर, अनुपम खेर यांचा अभिनय सोडला तर बाकीच्या विषयी बोलायला नको. चित्रपटातील प्रत्येक फ्रेममध्ये तुम्हाला हसायला येते. कॉमेडीची ही गाडी शेवटपर्यंत लोकांना
खिळवून ठेवते.नव्या-जुन्याची तुलना न करता चित्रपटाला गेलात तर तुम्हाला निखळ कॉमेडीचा आनंद हा ‘चष्मेबद्दूर’ देणार यात शंका नाही.

चित्रपट – चष्मेबद्दूर, दिग्दर्शक – डेविड धवन, संगीत – साजिद – वाजिद, कलाकार – अली जाफर, सिद्धार्थ, देवांशु शर्मा, तापसी पन्नु, ऋषी कपूर, भारती आचरेकर, अनुपम खेर.

Leave a Comment