अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट; नऊ ठार, २२ जखमी

जामुई: अफगाणिस्तानात आज (सोमवारी) एका महामार्गावरील बसखाली झालेल्या बॉम्बस्फोटात नऊजण ठार झाले, तसेच किमान २२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचा संशय येथील अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गावठी स्फोटके इम्प्रोवाइज्ड् एक्सप्लोझिव डिव्हाइस (आयइडी) वापरून बस उडविण्यात आली. त्यामध्ये एका महिलेसह नऊजण मृत्युमुखी पडले, तर किमान २२ जण जखमी झाले आहेत, असे वार्दाक प्रांताचे सरकारी प्रवक्ते अत्ताउल्ला खोगयानी यांनी सांगितले. ते म्हणाले, अमेरिकेच्या पाठिंब्यावरील काबूल सरकारशी गेली अकरा वर्षे लढत असलेले तालिबानी अतिरेक्यांचा या हल्ल्यामागे हात आहे.

ती बस सरकारच्या सार्वजनिक वाहतूक विभागाची होती. काबूल ते गजनी यादरम्यान ती प्रवासी वाहतुकीसाठी जात होती.

Leave a Comment