भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी इंडियन एअरलाईन्स कंपनीत पायलटची नोकरी करत होते, तेव्हा ते स्विडीश कंपनी साब स्कॅनियाचे एजंट किवा मिडलमन म्हणून काम करत होते असा गौप्यस्फोट विकिलिक्सने केला आहे. हा गौप्यस्फोट करताना विकिलिक्सने किसिंजर केबलचा हवाला दिला असून या केबल आज प्रसिद्ध केल्या जाणार आहेत असे समजते. १९७४ ते १९७६ या दोन वर्षांच्या कालावधीतील अशा सुमारे ४१ केबलच विकिलिक्स प्रसिद्ध करणार आहे.
विकिलिक्सच्या माहितीनुसार राजीव गांधी पंतप्रधानपदी येण्यापूर्वी पायलट म्हणून नोकरी करत होते तेव्हा ते वरील स्विडीश कंपनीसाठी मिडलमन म्हणून काम करत होते. ही कंपनी भारताला लढाऊ विमाने विकण्याच्या प्रयत्नात होती. या कंपनीप्रमाणेच फ्रान्सच्या विमान उत्पादक कंपनीनेही गांधी परिवाराचे भारताच्या राजकारणातील महत्त्व जाणले होते आणि ही कंपनीही गांधी परिवाराचा उपयोग विमान विक्रीसाठी करण्याच्या प्रयत्नात होती. स्विडीश कंपनीबरोबरचा व्यवहार पूर्ण हेाऊ शकला नव्हता कारण भारताने या विमानांच्या ऐवजी ब्रिटीश कंपनीची जग्वार विमाने खरेदी करण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता.
फ्रान्सच्या मिराज कंपनीसाठी तत्कालिन एअर मार्शल ओ.पी मेहरा यांचे जामात एजंट म्हणून काम करत होते तर राजीव गांधी स्विडीश कंपनीसाठी काम करत होते असे विकिलिक्सचे म्हणणे असून त्यावेळच्या भारतातील स्वीडीश राजदूतांनी त्यांच्या मायदेशी पाठविलेल्या अनेक पत्रांत राजीव गांधी आणि गांधी परिवार यांच्याविषयी उल्लेख केले आहेत असेही या आरोपांत म्हटले गेले आहे.
इंदिरा गांधी यांनी पुकारलेल्या आणीबाणीच्या काळात भारताचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडीस यांचाही उल्लेख असून जॉर्ज यांनी त्या काळात डायनामाईटचे स्फोट घडवून आणण्यासाठी सीआयएची मदत मागितली होती असाही गौप्यस्फोट विकिलिक्सने केला आहे. त्या संदर्भात फ्रान्सचे लेबर अॅटॅची यांच्याशी जॉर्ज यांनी बोलणीही केली होती असे त्यांचे म्हणणे आहे.