पंतप्रधानपद उमेदवारीबाबत चर्चा नको – भाजपची नेत्यांना तंबी

नवी दिल्ली, दि. ८ – देशभरात सध्या निर्माण झालेले काँग्रेसविरोधी वातावरण अजिबात विसविशीत होऊ देऊ नका. पक्षाच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार राष्ट्रीय कार्यकारिणी जोपर्यंत जाहीर करत नाही, तोपर्यंत कोणीही त्याविषयी जाहीर वक्तव्ये करू नयेत, अशी तंबी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने आपले नेते आणि कार्यकर्त्यांना दिली आहे.

नवनियुक्त पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आपली कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर, रविवारी या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक राजधानीत पक्षाच्या मुख्यालयात पार पडली, त्यावेळी बोलताना अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी अनेकांना कानपिचक्या दिल्या. यावेळी नव्या कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

पक्षामध्ये एक प्रकारची शिस्त असणे गरजेचे आहे, कोणाही नेत्याने पक्षश्रेष्ठींची परवानगी घेतल्याशिवाय माध्यमांशी बोलता कामा नये, असे सांगतानाच राजनाथ म्हणाले की, आपल्या पक्षाकडे देशाचे नागरिक एक वेगळा पक्ष म्हणून पाहतात. काँग्रेसला पर्याय देण्याची क्षमता असलेला एकमेव पक्ष म्हणून देश आपल्याकडे पाहात असताना, आपण बेशिस्तीने वागून कसे चालेल, असा सवालही त्यांनी केला.

देशभर असलेल्या काँग्रेसविरोधी वातावरणाचा फायदा हा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला मिळणार आहे हे खरे असले तरी, पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अधिक सजगपणे आणि जबाबदारीने वागायला हवे. काहीही गृहीत न धरता आपल्या पक्षाचा कार्यक्रम मतदारांसमोर नेणे गरजेचे राहील, असेही अध्यक्षांनी लक्षात आणून दिले.

Leave a Comment