आयुष्यातील सर्वात मोठी चूक: अजित पवार

मुंबई: आपण इंदापूरच्या सभेत केलेले विधान ही आपल्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक असून जनतेने आपल्याला माफ करावे; अशी विनवणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

महत्वाच्या पदावर काम करीत असताना आपण जबाबदारीने शब्द वापरायला हवे होते. माझ्या राजकीय आयुष्यात हे माझ्या हातून झालेली असर्वात मोठी चूक आहे. विधान भवनातही पवार यांनी माफी मागितली. आपल्याला दुष्काळग्रस्तांची थट्टा करायची नव्हती. तरीही माझ्या वक्तव्यामुळे ज्यांची मने दुखावली गेली असतील त्यांची मी माफी मागतो; असे पवार यांनी सांगितले

अजित पवार यांच्या बेताल वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांनी ‘ट्विटर’वर माफी मागितली आहे. विरोधी पक्षांनी अजित पवारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी; या मागणीसाठी विधानभवनसमोर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.

दुष्काळग्रस्तांची अर्वाच्य भाषेत टिंगल करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले विधान मागे घेत जनतेची जाहीर माफी मागितली असली तरी त्यांच्याविरोधात राज्यभर संताप व्यक्त होत आहे . विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी केली असून त्यासाठी जोरपण वाढविला आहे.

इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन अजितदादांच्या हस्ते झाले. त्यावेळी दुष्काळ व वीजटंचाईच्या प्रश्नावर बोलताना अजितदादांचा तोल गेला. उजनी धरणातून सोलापूरला पाणी देण्याच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात सोलापूरचे प्रभाकर देशमुख उपोषणास बसले आहेत. त्याचा उल्लेख करताना पवार यांनी अतिशय खालची पातळी गाठली . ‘ तो देशमुख का कुणीतरी आझाद मैदानात उपोषणाला बसलाय . ५५ दिवस झाले . काय झाले ? सुटले का पाणी ? पाणीच नाही तर काय सोडता . काय मुतता का तिथे आता ?’ असे वक्तव्य त्यांनी केले.’ पाणी प्यायला मिळत नसल्याने लघवी पण होत नाही ‘, अशी भाषा त्यांनी पुढे वापरली . त्यापुढे ‘ अजित पवार आज सकाळीच टाकून आले आहेत की काय , असे तुम्हाला वाटेल ‘, अशी कडीही त्यांनी केली .

त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्व विरोधी पक्ष एकवटले असून त्यांच्या कडून अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सेना नेते उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये तर मनसे नेते राज ठाकरे यांनी जळगाव येथील सभेत त्यांच्या विधानाचा खरपूस भाषेत समाचार घेतला. दोघांनीपण त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पवार यांनी शेतकऱ्यांचा अवमान केला आहे . त्यांनी वापरलेल्या भाषेमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे . त्यामुळे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदावर राहण्याचा त्यांना अधिकार नाही . त्यांनी राजीनामा द्यावा , अशी मागणी विनोद तावडे यांनी केली आहे . अजित पवार यांनी विवेक गमावलेला आहे . शेतकऱ्यांबाबत त्यांनी मस्तवाल भाषा वापरली आहे . ही त्यांच्या दुःखाची चेष्टा आहे , अशी टीका भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली . ७० हजार कोटी रुपये जर सिंचनासाठी खर्च केले असते , तर आज लोकांना पाण्यासाठी वणवण करण्याची गरज पडली नसती , असा टोला मुंडे यांनी लगावला.

सभेतील वक्तव्यांविरोधात राज्यभर रान पेटल्याचे दिसल्यानंतर अजित पवार यांनी माफीनामा सादर केला . ‘ मी इंदापूरच्या जाहीर सभेत केलेले वक्तव्य दुष्काळग्रस्तांबद्दल केलेले नव्हते . तरीही माझ्या वक्तव्यामुळे राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर अत्यंत विनम्रपणे मी त्यांची माफी मागतो ‘, अशा शब्दांत अजित पवार यांनी रविवारी रात्री दिलगिरी व्यक्त केली . ‘ इंदापूरच्या सभेतील माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढून त्यातून राजकीय लाभ मिळविण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत आहेत. राज्यात दुष्काळ असताना मतभेद विसरून सर्वांनी त्याचा सामना केला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे .

Leave a Comment