आयपीएलचा रंगच वेगळा

मुंबई – आयपीएल स्पर्धेला नुकतीच थाटात सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वांचे बरेच मनोरंजन होणार आहे. आयपीएलमध्ये आपण सर्वांनी रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकर यांना एकत्र फलंदाजी करताना बघितले. शाहरुख खानला मुंबई क्रिकेट असोसिएशनसोबत भांडताना आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जीसोबत नृत्य करतानाही पाहिले. इतकेच नव्हे तर कर्जबाजारी किंगफिशरचे मालक विजय मल्ल्या यांनासुद्धा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या मुंबईवरील विजयानंतर जल्लोष करताना आपण सर्वांनी पाहिले. आयपीएलमुळे मनोरंजन सुरूच राहणार आहे. त्यामुळे या आयपीएलचा रंगच वेगळा आहे असे म्हटले जात आहे.

आयपीएल-६च्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आता पुढचे आठ आठवडे फक्त क्रिकेटचीच चर्चा होईल. येत्या काळात रिकी पाँटिंग आणि हरभजनसिंगसुद्धा अंतर्गत वाद विसरून चौकार, षटकारांच्या मदतीने पैसा गोळा करतील. यामध्ये मित्रांना वैरी आणि शत्रूंना मित्र बनताना सर्वांनी पाहिले आहे. एक वेळ हरभजन आणि पाँटिंगचे मैदानावरील वैर जगजाहीर होते. मात्र, आता पाँटिंग मुंबईचा कर्णधार आहे आणि हरभजन त्याच्या आदेशाचे पालन करीत आहे. हरभजनशी संबंधित दुसरी घटना मैत्रीपासून शत्रुत्वाची आहे. आयपीएलमध्येच त्याने विरोधी संघाकडून खेळत असलेला आपला मित्र एस. श्रीसंतच्या श्रीमुखात भडकावली होती. या प्रकरणानंतर दोघांत पूर्वीसारखे मैत्रीचे संबंध राहिले नाहीत.

देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही तरीही आयपीएलच्या माध्यमातून कोट्यधीश बनण्याची संधी आहे, हेसुद्धा खेळाडू जाणून आहेत. उदाहरण घ्यायचे झाल्यास युसूफ पठाण प्रदीर्घ काळापासून भारतीय संघाबाहेर आहे. मात्र, केकेआरसोबत त्याचा कोट्यवधी रुपयांचा करार आहे. त्यामुळेच म्हटले जात आहे आयपीएलचा रंगच वेगळा आहे

Leave a Comment