यापुढे केंद्रात प्रादेशिक पक्षनेतेच प्रभावशाली -अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

पुणे, दि. 6 – देशातील राजकारणाचा स्वभाव बदलत आहे. त्यामुळे राजकीय नेतृत्वाचे विकेंद्रीकरण होत आहे. अशा परिस्थितीत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी बदल स्वीकारले पाहिजेत. असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कै. जयंतराव टिळक स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

ते म्हणालेे, सध्याची पिढी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची समीक्षा करून आंबेडकरी चळवळ पुढे नेत आहे. राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेस आणि भाजपसारखे पक्ष छोट्या राजकीय पक्षांचे विघटन करण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु, सद्यस्थितीमध्ये हे शक्य नाही. आर्थिक आणि सामाजिक स्तरावर प्रादेशिक पातळीवरील पक्ष तेथील जनतेला जवळचे वाटू लागले आहेत. हे आपल्याला प्रत्येक राज्यात पहायला मिळेल. त्यामुळे केंद्रामध्ये राष्ट्रीय पक्षांपेक्षा हे प्रादेशिक पक्षांचे नेतृत्त्वच यापुढील काळामध्ये प्रभावशाली राहील.

जागतिक स्तरावर होत असलेल्या घडामोडी तसेच राष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या बदलांचा अभ्यास आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी करायला हवा. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची सध्याच्या परिस्थितीशी सैद्धांतीक मांडणी करून चळवळ पुढे नेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखविले.
—————————-

Leave a Comment