केळशी – त्सुनामीच्या टेकडीचे गांव

kelashi

कोकण किनारपट्टी म्हणजे अनेक सुंदर सुंदर गावांचे माहेरघर. शांत, निवांत, नीरव शांतता असलेली ही छोटी छोटी गांवे निसर्गाच्या वरदहस्ताने अधिकच सुंदर वाटतात. दाट झाडी, सुंदर समुद्र किनारे आणि साधी भोळी माणसे या गांवाना अधिक देखणे बनवितात. त्यातीलच एक अगदी छोटे खेडे म्हणजे केळशी. दापोलीपासून केवळ ३४ किमीवर असलेले हे टुमदार खेडे येथील महालक्ष्मी मंदिर, विस्तीर्ण आणि स्वच्छ समुद्र किनारा, याकूब बाबा दर्गा आणि त्सुनामी मुळे तयार झालेली वाळूची टेकडी यासाठी प्रसिद्ध आहे.
Kalsi
उटंबर टेकडी जेथे समुद्रला मिळते, त्याच टेकडीच्या पायथ्याशी दगडी तटबंदी असलेले स्वयंभू महालक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर पेशवेकालिन आहे. मंदिराच्या आवारातच गणेश, शंकर महादेव यांचीही देवळे आहेत आणि कमळांच्या फुलांनी गच्च भरलेले कुंडही. ही कमळे नजरेला पडताच प्रसन्नता आपोआप शरीरात भरते. या मंदिरापासून साधारण १ किमीवर आहे याकूब बाबा दर्गा. हा दर्गा ऐतिहासिक महत्त्वाचा आहे.३८६ वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या याकूब बाबांचा हा दर्गा अनेक राजे महाराजांचे श्रद्धास्थान होता. आपले शिवाजी महाराज, संभाजी राजे, थोरले बाजीराव हेही या याकूब बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून येथे भेट देत असत असे सांगितले जाते.
Kalsi1
केळशीचा समुद्र किनारा जवळजवळ तीन किलोमीटर इतका प्रचंड आहे. समुद्राची गाज ऐकत, मुक्त वारा अंगाखांद्यावर घेत या किनार्‍यावरून चालत राहण्याचे सुख सांगून समजणार नाही. याच किनार्‍यावर केवडा, सुरू यांची दाट बने आहेत. नारळी पोफळीची संगत तर दर्यासाठी नेहमीचीच. या किनार्याकवर शंख शिपलेही प्रंचड प्रमाणात सापडतात. शंख शिपले गेाळा करण्यात वेळ कसा जातो पत्ता लागत नाही. येथे अनेकवेळा प्राचीन नाणी, तुटकी फुटकी प्राचीन भांडीही सापडतात. या विस्तीर्ण किनार्‍यावर एका बाजूला असलेल्या टेकडीवरून सूर्यास्त पाहण्याची मजा कांही औरच. समुद्रात हळूहळू अस्ताला जाणारा सूर्य समुद्राच्या पाण्यावर असे रंग पसरवितो की बोलता सोय नाही. डोळ्याचे पारणे फिटलेच पाहिजे.
Kalsi2
गावाच्या दक्षिण भागात वाळूची नैसर्गिक टेकडी दिसते. ही टेकडी पूर्वी कधीकाळी आलेल्या त्सुनामी लाटेमुळे बनली असल्याचे सांगितले जाते. पुरातत्त्व विभागातर्फे येथे संशोधन केले जात असून सुमारे २ हजार वर्षांपूर्वी हे गांव महत्त्वाचे बंदर असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. प्री इस्लामिक काळात येथे अरब खलाशी चीनला व्यापारासाठी जाताना थांबत असावेत असे पुरातत्त्व विभागाचे म्हणणे आहे.

ग्रामीण कोकणाचा आनंद घ्यायचा असेल तर केळशीला जाण्याशिवाय पर्याय नाही. या छोट्याशा गावांत राहण्यासाठी मोठी हॉटेल्स नाहीत. मात्र ओळखीतून घरगुती व्यवस्था होऊ शकते. दापोलीहून बस, रिक्षा, जीपने येथे येता येते. शहराच्या गजबजाटापासून दूर, दोन दिवस शांततेत काढण्यासाठी तरी केळशीला जायलाच हवे.

Leave a Comment