बंगलूर – कर्नाटक विधानसभेच्या 2008 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी स्वत: लिहून दिलेल्या माहितीनुसार तरी या राज्यातले 42 टक्के मंत्री कसल्या तरी आरोपांत अडकलेले असून त्यांच्यावर खटले जारी आहेत. असोसिएशन ऑफ डेमॉक्रेटिक रिफॉर्मस् आणि कर्नाटक इलेक्शन वॉच या संघटनांनी या उमेदवारांनी सादर केलेली प्रतिज्ञा पत्रे हस्तगत करून त्यांचे विश्लेषण केले तेव्हा त्यांना ही बाब समजली. 24 मंत्री आरोपी आहेत आणि त्यातले दोन मंत्री तर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, चोरी अशा आरोपात गुंतलेले आहेत.
बाळकृष्ण लक्ष्मण जरकोहोली आणि सी. टी. रवी हे दोन भाजपाचे मंत्री गंभीर आरोपाखाली आहेत. त्यातल्या जरकीहोली यांच्या विरोधातल्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपात तर खटलाही जारी आहे. सी.टी. रवी हे चिकमंगळूरचे आहेत. त्यांच्यावर दोन जातीत दंगल घडवणे या आरोपाखाली अनेक खटले जारी आहेत. मंत्रिमंडळातल्या 24 मंत्र्यांपैकी 18 मंत्री कोट्यधीश आहेत. म्हणजे 75 टक्के मंत्री कोट्यधीश आहेत. आमदारांत हे प्रमाण 61 टक्के आहे. 215 पैकी 131 आमदार धनाढ्य आहेत. भाजपाचे विजयनगर या मतदार संघाचे आमदार आनंद सिंग हे तर 88 कोटी सहासष्ट लाख रुपयांचे धनी असून ते सर्वात श्रीमंत आमदार ठरले आहेत. आमदारांची सरसरी संपत्ती सहा कोटी रुपये आहे.