मोबाईलची चाळीशी साधेपणाने साजरी

वॉशिग्टन दि.५ – आयफोन, फेसबुक, सॅमसंग गॅलॅक्सी सारख्या स्मार्टफोनने जगाची बाजारपेठ ओसंडून वाहत असताना आणि मोबाईल हे आता सर्वसामान्यांच्या हातातही विराजमान झाले असताना मोबाईल फोनने आपली चाळीशी गाठली हे अनेकांच्या स्मरणातही राहिलेले नाही. मोबाईलचा चाळीसावा वाढदिवस अतिशय साधेपणाने आणि कांही ठराविक व्यक्तींच्याच उपस्थितीत कोणताही मोठा समारंभ न करता साजरा झाला आहे.

आपल्यापैकी अनेकांना माहितीही नसेल की ३ एप्रिल १९७३ या दिवशी मोटरोलाचे इंजिनिअर आणि मोबाईल कम्युनिकेशन तंत्रज्ञानावर काम करत असलेल्या पथकाचे प्रमुख मार्टिन कूपर यांनी पहिला मोबाईल कॉल न्यू यॉर्कच्या सहाव्या अॅन्हेन्यूमधून पत्रकार परिषदेला जाण्यापूर्वी केला होता. हा कॉल मोटोरोला डायना टीएसी या उपकरणावरून केला गेला होता आणि या फोनचे वजन होते तब्बल १ किलो. या फोनची बॅटरी होती २० मिनिट क्षमतेची. हा कॉल त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी बेल लॅबचे जोल इंग्लर यांना केला होता.

या निमित्ताने आपल्या आठवणींना उजाळा देताना कूपर म्हणाले आम्ही हा फोन पोर्टबल करायचा निश्चयच केला होता कारण माणसे सतत मोबाईल असतात. कुठेही कुठूनही माणसाला फोनवरून संवाद साधता आला पाहिजे यासाठीच आमचा प्रयत्न होता. त्याचवेळी आमची प्रतिस्पर्धी कंपनी बेल लॅब कार फोन तयार करून त्यात आपली मोनापोली मिळविण्याच्या मागे होती. त्या इर्षेवरच आम्ही मोबाईल बनविला. अर्थात कूपर यांचा या शोधासाठी वर्षाच्या सुरवातीलाच ड्रेपर प्राईस देऊन सन्मान केला गेला.

मागे पाहताना चाळीस वर्षात या मोबाईलने फारच मोठे अंतर कापले असल्याचे लक्षात येत आहे. डीसी संशोधन फर्मच्या अंदाजानुसार २०१३ या वर्षात जगभर ९० कोटी स्मार्टफोन तर तितक्याच संख्येन फिचर फोन विकले जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे जाहिरात माध्यम म्हणूनही मोबाईलला पसंती मिळत असून मोबाईल जाहिरातींचा खर्चही वाढत चालला असून ही वाढ ७७ टक्कयावर पोहोचेल असाही अंदाज या संस्थेने वर्तविला आहे.

Leave a Comment