ठाणे: गुरुवारी रात्री ७ मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळण्याच्या दुर्घटनेला कारणीभूत असलेला आणि दुर्घटना घडताच पसार झालेला बांधकाम व्यावसायिक सलीम शेख याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्याचा भागीदार जमील कुरेशी अद्याप गायब आहे. या प्रकरणी जमील कुरेशी आणि सलीम शेख या दोघा बांधकाम व्यावसायिकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करण्यात आला आहे.
या दुर्घटनेला महापालिकेचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याची गंभीर बाबही समोर येत असून या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे तर तब्बल ७९ जण जखमी झाले आहेत.
या इमारतीचे बांधकाम एका ओढ्याचे पात्र बेकायदेशीरपणे बुजवून अवघ्या दोन महिन्यात करण्यात आले. या इमारतीत २४ कुटुंब राहत होती तर दोन सदनिकांमध्ये खाजगी क्लासेस सुरू होते. या परिसरातील बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसापूर्वीच आश्वसन दिले असल्याने येथे आणखी मजले वाढविण्याची आणि इमारत पूर्ण करण्याची बांधकाम व्यावसायिकांची घाई होती.
ही इमारत कोणतीही परवानगी न घेता वन खात्याच्या जागेवर अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून उभारली गेली. या इमारतीचे नियोजन आर्किटेक्ट अथवा स्थापत्य अभियंत्याकडून करण्यात आले नव्हते; या बाबी दुर्घटनेनंतर महापालिका अधिकार्यांनी मान्य केल्या. अशाच प्रकारे ठाण्यात अनेक अनधिकृत इमारती असल्याची कबुली सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांनीही दिली.
स्थानिक नागरिकांनी या बेकायदेशीर बांधकामाबाबत अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. वारंवार या धोकादायक बांधकामाची छायाचित्रही संबंधित अधिकार्यांकडे दिली होती. मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळेच हे बळी गेली असून आणखी हजारो जीव बेकायदेशीर धोकादायक इमारतीत टांगणीला आहेत; असा इशारा स्थानिक नागरिक देतात.