अमेरिकन व्हीसा – अर्ज केल्यास मोदींचे स्वागत

वॉशिग्टन दि.५- गुजराथचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या व्हीसासाठी अर्ज केला तर त्यांचे स्वागतच आहे असे अमेरिकन अधिकार्‍यांनी सांगितले. ओबामा प्रशासन मोदींच्या अर्जाचा विचार मेरिटनुसारच करेल असाही विश्वास या अधिकार्‍यांनी व्यक्त केला. स्टेट विभागाच्या प्रवक्त्या व्हिक्टोरिया न्यूलंड यांनी दररोजच्या वार्तांकन कार्यक्रमांत पत्रकरांपुढे ही माहिती दिली.

अमेरिकेतील लॉ मेकर्सच्या पथकाने गुजराथला नुकतीच भेट दिली त्यावेळी मोदींशीही संवाद साधला होता. या लॉ मेकर्सनी मोदींना अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले होते त्यावरून व्हिक्टोरिया यांना पत्रकारानी मोदींना अमेरिका व्हीसा देणार काय असा सवाल केला होता. त्यावेळी बोलताना न्यूलंड म्हणाल्या की अमेरिकेची व्हिसा पॉलसी बदललेली नाही. मोदी व्हिसासाठी अर्ज करू शकतात मात्र व्हिसा देण्याचा निर्णय नेहमीच्या पद्धतीने म्हणजे केस बाय केस होऊ शकतो.

गुजराथ भेटीवर गेलेल्या अमेरिकन लॉ मेकरमुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापार संबंध अधिक दृढ होणार असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की भारत भेटीवर अशी पथके वारंवार गेली तर गुजराथच्या माध्यमातून भारत आणि अमेरिकेतील नागरिकांतही सशक्त बंध तयार होऊ शकणार आहेत. त्यामुळे अशा अनेक क्षेत्रातील व्यक्तींच्या मंडळांनी भारताला भेटी द्याव्यात अशीच आमची इच्छा आहे.

मोदी यांना अमेरिकेने २००५ सालापासून व्हिसा सतत नाकारला असून गोध्रा दंगलींच्या पार्श्वभूमीवर हा व्हिसा नाकारला जात होता असे सांगितले जात आहे.

Leave a Comment