अफजल गुरु फाशीनंतर काश्मीर मधील पर्यटक संख्या घटली

kashmir2 पुणे ता ५ : संसदेवरील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेला अतिरेकी अफजल गुरु याला फाशी दिल्यानंतर जम्मू- काश्मीर मधील परदेशी पर्यटक संख्या घटली नाही , मात्र देशातून येणाऱ्या पर्यटक संख्येत १० टक्केच घट झाली अशी माहिती जम्मू- काश्मीरचे पर्यटन मंत्री गुलाम अहमद मीर यांनी गुरुवारी रात्री येथे पत्रकारांना दिली.

यंदा जम्मू- काश्मीरतर्फे एक्स्प्लोअर न्यू काश्मीर ही मोहीम हाती घेण्यात आली असून त्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या रोड शो साठी ते येथे आले होते. मीर यांनी यावेळी कोणकोणते नवे भाग राज्य सरकारने पर्यटना साठी विकसित केले आहेत याची माहिती दिली. त्यावेळी ते म्हणाले की अफजल गुरूच्या फाशीनंतर पर्यटन घटेल अशी अपेक्षा होती मात्र तसे झाले नाही. फेब्रुवारीत सीमेवर झालेल्या चकमकीनंतर त्यात फरक पडला नाही हे विशेष आहे. देशातून येणारी पर्यटक संख्या पाहता राज्य सरकार आणि देशाला मिळणार्या महसुलात सर्वाधिक हिस्सा महाराष्ट्राचा आहे.२०१२ मध्ये दहा लाख पर्यटक काश्मीरमध्ये आले, २०१३ मध्ये ही संख्या १३ लाखावर जाईल असा अंदाज आहे, असे नमूद करून ते म्हणाले की येथील प्रसार माध्यमांनी काश्मीर मधील वार्तांकन करताना एखाद्या भागात अनुचित घटना झालेली असल्यास नेमके ठिकाण नमूद करावे मात्र काश्मीर असा सरसकट उल्लेख करू नये. हौस बोट, हॉटेल , घोडा मालक अशा सर्वांचे पोट पर्यटनावर अवलंबून असल्याने अधिकाधिक पर्यटक यावेत अशी त्यांची इच्छा आहे. कोकरनाग, वेरी नाग, वादवान, मानस बल अशा नव्या ठिकाणांवर आम्ही भर देत आहोत.

युरोपातील अनेक देशांच्या राजदूतांना गोल्फ खेळण्यासाठी आमंत्रित केले असून त्यातून काश्मीर हे गोल्फचे जागतिक केंद्र बनावे असा आमचा प्रयत्न आहे.
कोकण प्रमाणे येथील नागरिक आपली घरे पर्यटकांना उपलब्ध करून देणार असून त्याचा फायदा रोजगार वाढीत मिळेल असे सांगून ते म्हणाले की महाराष्ट्रातून आणखी विमान सेवा मिळावी यासाठी दोन्ही राज्यांचे पर्यटन विभाग संयुक्तपणे पुढील आठवड्यात नागरी विमान वाहतूक संचालनालय प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. खासगी उद्योगानी येथे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून केंद्र सरकारकडून यंदा आणखी २०० कोटी रुपये पर्यटन विक्सासाठी मिळणार आहेत.

Leave a Comment