सुंदर पृथ्वीची काळजी घ्यायलाच हवी: सुनीता विल्यम्स

उवरसाड (गुजरात): अंतराळयानातूनच आपल्याला पृथ्वी किती सुंदर आहे हे समजले. त्यामुळे आपण आपल्या ग्रहाची काळजी घ्यायलाच हवी; असे प्रतिपादन भारत दौर्‍यावर असलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी येथे केले.

येथील युनायटेड स्कूल ऑफ बिझनेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की; आपली पृथ्वी खरोखरच किती सुंदर आहे. ज्या सुंदर वसुंधरेवर आपण राहतो; तिची काळजी आपण घ्यायलाच हवी. सध्या मोठया प्रमाणावर आपण कचर्‍याची निर्मिती करत आहोत. मी जेंव्हा अंतरिक्षयानात होते; तेंव्हाच आपण किती सुंदर ग्रहावर राहतो, हे मला समजले. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मोठया प्रमाणावर कचरा निर्माण होत आहे. अंतराळात असतानाच पृथ्वी किती सुंदर आहे हे समजले. त्यामुळे आपण तिची काळजी घ्यायलाच हवी; असेही
त्यांनी नमूद केले.

अंतराळ मोहिमांमधून शिकलेल्या सर्वात महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलताना
त्या म्हणाल्या की; या मोहिमांमुळे जगभरातील सर्व लोक एक आहेत याची जाणीव झाली. प्रत्येकालाच दुसर्‍याकडून शिकण्याची इच्छा असते. त्याचप्रमाणे मीही इतर सहकारी अंतराळवीरांकडून शिकत आहे.

माझे पालक माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. माझ्या वडिलांचा भारतीय स्वातंत्र्यचळवळीशी जवळचा संबंध होता तसेच ते महात्मा गांधींजींच्या संपर्कातही होते. मदर तेरेसा यांचा सेवाभावही खूप प्रेरणादायक आहे; असेही सुनीता यांनी अभिमानाने नमूद केले.

नवीन अंतराळयान बांधत असल्याचे नमूद करत दीर्घकाळासाठी आपले स्थिर होवून पतीला
मदत करायची आहे. विज्ञानशिक्षिका व्हायला आवडेल, असेही सुनीता यांनी सांगितले.

अंतराळातून आपण पृथ्वीशी पुरेशा प्रमाणात जोडले गेलेलो असतो. कुटूंबीय व मित्रांना दूरध्वनीही करू शकतो, त्यामुळे एकटे वाटण्याचा प्रश्‍नच येत नाही, असेही सुनीता यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरादाखल सांगितले.

Leave a Comment