मोदींच्या सूचक विधानावर राजकीय रणकंदन

नवी दिल्ली: गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विधानाची आपल्याला नेहेमीच धास्ती वाटते; असे सांगत काँग्रेस प्रवक्ते मनीषा तिवारी यांनी मोडी यांना गुजरातमधील २००२ च्या दंगलीप्रमाणे संपूर्ण देशात दंगली तर पेटवायच्या नाहीत ना अशी शंका व्यक्त केली.

मोदी यांनी ‘मला आता केवळ गुजरातचे नाही; तर भारतमातेचे ऋण फेडायचे आहे;’ असे विधान गुरुवारी केले होते. या विधानावरून त्यांची पंतप्रधान पदाची आस सूचित होत आहे. त्यामुळे विरोधी काँग्रेस पक्षासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या जनता दलाने (यु) तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सन २००२ मध्ये गुजरातमध्ये भडकलेल्या जातीय दंगलींना मोडी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यालयातून भडकवीत होते. या दंगलीत हजारो मुस्लिमांची हत्या झाली. त्यामुळे मोदी यांचे सर्वधर्म समावेशकत्व शंकास्पद आहे; अशा शब्दात तिवारी यांनी मोदींवर टीका केली.

या टीकेला प्रत्युत्तर देताना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणले की; मोदींच्या वक्तव्यावर विधायक प्रतिक्रिया देण्या ऐवजी काँग्रेसने मोदींना जातीयवादी ठरवून त्यांचे कोतेपण दाखविले आहे. आपल्या सरकारचे अपयश लपविण्यासाठी नैराश्यग्रस्त काँग्रेस मोदींवर टीका करीत आहे. मात्र सन २००२च्या दंगलीनंतर गुजरातमध्ये कधीही धार्मिक अथवा जातीय तणाव मिर्माण झालेला नाही; याकडे लक्ष वेधतानाच जावडेकर यांनी जातीय दंगली इतर राज्यातही झाल्याची आठवण करून दिली.

भाजपचा रालोआमधील सहकारी असलेल्या जनता दलाचे (यु) अध्यक्ष नितीशकुमार यांनी तर मोडी हे भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तर आपण आघाडीतून बाहेर पडू; असा इशाराच दिला. ‘मला देशासाठी काम करायचे आहे; या मोदींच्या विधानाचा अर्थच मला कळत नाही. जो माणूस आपापल्या राज्याचे सेवा करतो तो पर्यायाने देशाची सेवा करीतच असतो; अशा उपरोधिक शब्दात नितीशकुमार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Leave a Comment