नक्षलवादावर शांतीचा उतारा

नक्षलवादी चळवळ संपवण्यासाठी सरकारने आता काही निर्णायक पाऊल उचलले आहे. छत्तीसगडमध्ये तर पोलिसांनी चक्क लोकांच्या हृदयातच स्थान मिळवण्याचा प्रयास जारी केला आहे. राखीव पोलीस दलाच्या अधिकार्‍यानी समाजाला आपलेसे करण्यासाठी वैद्यकीय मदतीचे धर्मादाय उपक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे समाजातल्या आदिवासी बांधवांना पोलिसांविषयी आस्था वाटायला लागली असून नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी होत आहे. गडचिरोलीतही पोलीस अधीक्षक महंमद सुवेज हक यांनी अशाच गांधीगिरीच्या माध्यमातून नक्षलवादी कुटुंबांच्या भेटी घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

अनेक भरकटलेल्या नक्षलवादी कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची वाताहत झाली आहे आणि त्यांनी आपल्या घर प्रमुखाला नक्षलवादी संघटनेतून बाहेर काढून घरी आणावे  अशी विनंती त्यांचे कुटुंबीय हक यांना करीत आहेत. आजवर  गडचिरोलीत बदली झालेल्या पोलीस अधिकार्‍यानी नक्षलवादावर बंदुकीचाच इलाज करण्याचा प्रयत्न केला.  सरकारचे धोरण आणि कल्पना तशी नव्हती पण पोलीस अधिकारी बंदुकीवरच अधिक विश्वास ठेवत होते. त्यामुळे नक्षलवाद संपण्याच्या ऐवजी वाढत गेला.

आता पहिल्यांदाच गडचिरोलीला असा एक पोलीस अधिकारी आला आहे की जो मनापासून तिथे काम करीत आहे. अन्यथा आजवर आलेले पोलीस अधिकारी शिक्षा बदली मिळूनच तिकडे आले होते. महाराष्ट्राच्या अन्य भागांत कोठेतरी छान सुखाने काम करता करता नेत्यांची मर्जी सांभाळली नाही की गडचिरोलीला बदली केली जाते. तिथे आलेला प्रत्येक अधिकारी नाइलाजाने तिथे येतो आणि  तिथून बदली होईपर्यंत कसे तरी काम करीत राहतो पण, आता पहिल्यांदाच असा एक पोलीस अधिकारी आला आहे की जो नक्षलवादी कुटुंबांच्या हृदयात शिरून मनापासून काम करीत आहे.

इकडे असे प्रयत्न जारी असताना मुंबईं उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आणि सारे वातावरण बदलून गेले. नक्षलवादी जे तत्त्वज्ञान मांडतात ते अनेकांना पटते. काहींना आवडते. त्यांचा नक्षलवादाशी काही संबंध नाही. त्यांनी नक्षलवादी कसे असतात हे पाहिलेलेही नाही. पण तत्त्वज्ञान पटते हा काही गुन्हा नाही आणि ते आवडले म्हणून त्यांनाही नक्षलवादी समजता येणार नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे अनेकांना नवी दिशा मिळाली आहे. हे तत्त्वज्ञान आवडलेल्या काहींनी गाण्यातून या तत्त्वज्ञानाची भलामण  केली होती.
 
पोलीसांना नक्षलवादाचा खरा बंदोबस्त करता येत नाही पण समाजाच्या आणि सरकारच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी ते कोणाला तरी पकडून नक्षलवाद्यांचा बंदोबस्त केल्याचा आव आणत असतात. अशा वेळी त्यांना हे सहानुभूतीदार सापडतात. त्यांना पकडून पोलीस आत टाकतात. कायदा त्यांच्या मदतीला असतोच. मग असे लोक अनेक महिने तुरुंगात खितपत पडतात. पण उच्च न्यायालयाने अशा लोकांना दिलासा दिला. परिणामी अशाच काही कार्यकर्त्यांनी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होण्याचे  ठरवले. कबीर कला मंचाच्या दोघा कार्यकत्यानी जाहीरपणे मुंबईत विधानभवनासमोर समारंभपूर्वक शरणागती पत्करली. हे कलाकार फार मोठे दोषी होते असे नाही. त्यांना मूळ विचार नीट समजला नव्हता आणि ते मार्ग चुकले होते.

लोकांतल्या दलित, वंचित घटकांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे ही गोष्ट कोणी नाकारत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तर अशा लोकांच्या उध्दारासाठी सारा जन्म खर्च केला. त्यांच्यावर समाजातले प्रस्थापित वर्ग अन्याय करतात. त्यामुळे अन्यायाने पीडित झालेल्या लोकांच्या मनात चीड निर्माण होणे साहजिक असते आणि त्या चिडीपोटी त्यांना हातात शस्त्रे घेण्याची प्रेरणाही मिळू शकते. परंतु असा वंचित घटक हातात शस्त्रे घेऊन उभा राहिला तर ते प्रस्थापित वर्गाला हवेच असते. आपल्या विरोधातली ही चळवळ दडपून टाकणे त्यांना सोपे जाते कारण चळवळ करणार्‍यापेक्षा प्रस्थापित वर्गाकडे अधिक शक्तिशाली दमणशक्ती असते आणि या गरिबांनी हातात शस्त्रे घेतली की हहिंसक चळवळ म्हणून तिची बदनामी करणे या प्रस्थापित वर्गाला सोपे जाते.

हिंसक चळवळीमध्ये शेवटी गरीबांचे नुकसान होते आणि चळवळीतून जे साध्य करायचे आहे ते ही साध्य होत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हे मोठे विवेकशील तत्त्वज्ञान मांडले आणि त्यासाठी तिघांना गुरु मानले. गौतम बुध्द, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले हे त्यांचे गुरु. या तिघांच्याही विचारातून आणि शिकवणीतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तहीन क्रांतीची आणि शांततापूर्ण परिवर्तनाची प्रेरणा मिळाली. पण कबीर कलामंच नाव धारण करणार्‍याकाही कलाकारांनी कबीर समजून न घेताच कलामंचाला कबीर नाव दिले. त्यामुळे त्यांची वाटचाल नक्षलवाद्यांच्या दिशेने सुरू झाली. अशा लोकांनी आता आपला मार्ग चुकला असल्याचे मान्य केले असून शरणागती स्वीकारली आहे. शीतल साठे आणि सचिन माळी अशी या दोघांची नावे. समतावादी झाले तरी ते वाट चुकलेले आणि हातात शस्त्रे घेऊन समता प्रस्थापित करू पाहणारे समतावादी होते. त्यांची शरणागती हा एक चांगला संकेत आहे.

Leave a Comment