मुंबई दि.५ – मुंबईच्या १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अभिनेता संजय दत्त आणि अन्य दोषी झेबुन्निसा यांच्या शिक्षा माफ कराव्या यासाठी राष्ट्रपतींकडे अर्ज केलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी गरीब आणि बेसहारांना न्याय मिळवून देण्यासाठी -द कोर्ट ऑफ लास्ट रिसॉर्ट – नांवाची स्वयंसेवी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. या संस्थेचे १५ एप्रिल रोजी काटजू यांच्या राहत्या घरातच उद्घाटन होत असून या संस्थेचे मुख्यालय दिल्लीत तर अन्य राज्यात तिच्या शाखा काढण्यात येणार आहेत.
याविषयी आपल्या ब्लॉगवर काटजू यांनी भारतात तुरूंगात असलेल्या अनेक बंदींवर अन्याय होत असल्याची जाणीव त्यांना झाली असल्याचे म्हटले आहे. तुरूंगात खितपत पडलेल्या कैच्या कैदेतील अनेक आरोपींची सुनावणीच दीर्घ काळ झालेली नाही तर पोलिसांनीही अनेकांना खोट्या केसेसमध्ये गुंतवून तुरुंगात डांबले आहे. बरेच वेळा तुरूंगात खूप वर्षे काढल्यानंतर हे आरोपी न्यायालयात निर्दोष सिद्ध होतात. म्हणजे या आरोपींवर एक प्रकारे अन्यायच होत असतो. मात्र त्यांच्या पाठीमागे बळ नसते व त्यामुळे अनेक गरीब आणि बेसहारा लोकांना निष्कारणच त्रास भोगावा लागतो असे काटजू यांचे म्हणणे आहे.
ही स्वयंसेवी संस्था माहिती अधिकाराच्या हक्काचा वापर करून तुरूंगातून कच्च्या कदेत असलेल्या तसेच कांही प्रकरणात शिक्षा भेागत असलेल्या कैद्यांची माहिती गोळा करणार आहे. त्याची पडताळणी करून ज्यांच्याबाबत न्यायालयाकडून चुकीचे निर्णय दिले गेले आहेत असे वाटेल त्यांच्यासाठी जामीन मिळावा म्हणून प्रयत्न करणार आहे. या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्षपद प्रसिद्ध वकील फली नरीमन यांच्याकडे देण्यात येणार आहे असेही समजते.