ऑनलाईन जाहिरात व्यवसायाची कोटीच्या कोटींची उड्डाणे

नवी दिल्ली दि.५ – भारतात मार्च २०१४ पर्यंत ऑनलाईन जाहिरात व्यवसाय २९३८ कोटी रूपयांवर जाईल असा अंदाज इंटरनेट अॅन्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया आणि आयएमआरबी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. यात सर्च, डिस्प्ले, मोबाईल, सोशल मिडिया, ई मेल आणि व्हिडीओ अॅडव्हरटायजिंग या सर्वच क्षेत्रांचा समावेश आहे.

हा व्यवसाय अतिशय वेगाने विकसित होत असून दरवर्षी त्यात सरासरी २९ टक्के वाढ दिसून येत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मार्च २०१३ च्या वर्षात हा व्यवसाय २२६० कोटी रूपयांचा होता तो पुढील वर्षात २९३८ कोटी रूपयांवर जाईल आणि या व्यवसायातील वाढही ४० टक्कयांवर जाईल असे या संस्थांचे म्हणणे आहे. आत्तापर्यंत या व्यवसायात सर्च आणि डिस्प्ले जाहिरातींचा वाटा मोठा होता मात्र आता त्यांची जागा मोबाईल, सोशल मिडिया आणि व्हिडीओ जाहिराती घेत असल्याचे दिसून आले आहे.

भारतात मोबाईल वापरणार्यांंची संख्याही झपाट्याने वाढती आहे. इतकेच नव्हे तर मोबाईल जाहिरातींच्या खर्चातही २०११-१२ च्या तुलनेत दुप्पट वाढ होऊन हा आकडा ११५ कोटींवरून २०३ कोटींवर गेला आहे. इंटरनेट आता मोबाईलवरही उपलब्ध झाल्याने ही वाढ होत असल्याचेही अहवालात म्हटले गेले आहे. मोबाईल जाहिरातीत १० टक्के वाढ झाली आहे तर सोशल मिडीया जाहिरातींचा खर्च ३०० कोटींवर गेला असून ही वाढ १३ टक्के आहे. ईमेल आणि व्हीडीओ जाहिरातीतील खर्चात अनुक्रमे ३ आणि सात टकके वाढ झाली असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment