उस्मानाबाद – गेल्या काही दिवसापासून शाळेत, महाविद्यालयात जाणार्या मुलींची छेड काढण्याचे प्रमाण वाढत चालले होते. आता या प्रकाराला आळा घालण्यासाठी उस्मानाबाद शहरातील खासगी कोचिंग क्लासेस चालक सरसावले आहेत. त्यांनी क्लासेसच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार काही ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे कोचिंग क्लासेससोबतच शैक्षणिक परिसरावरही वचक निर्माण झाला आहे.
यामुळे आता येत्या काळात विद्यार्थिनींची छेड असो की चोरीच्या घटना, सर्व प्रकारांची नोंद आता सीसीटीव्ही कॅमेर्यात होणार आहे. शहरातील काही खासगी कोचिंग क्लासेसमध्ये कॅमेरे बसवण्यात आले असून परिसरावरही कॅमेर्यांची नजर राहणार आहे.
बहुतांश क्लासेस शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात असल्यामुळे कोचिंग क्लासेससोबत शाळेचा परिसरही कॅमेर्यात कैद होत आहे. शहरातील आदर्शनगरमध्ये असलेल्या यशश्री क्लासेसने इमारतीमधील सर्व खोल्यांसह परिसरात तसेच मुख्य रस्त्यापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या कॅमेर्यांचा वापर सुरू झाला आहे. परिसरातील चौकांमध्ये कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
शाळा, क्लासेसच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशा सूचना उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर यांनी दिल्यानंतर काही क्लासेस चालकांनी पुढाकार घेतला. यशश्री क्लासेसमुळे परिसरात कॅमेरे बसले असले तरी भोसले हायस्कूल परिसरात क ॅमेरे बसवण्यासाठी क्लासेस चालकांनी तसेच शाळेने पुढाकार घेण्याची गरज आहे.