भारतीय लेखिका रुथ प्रवर झाबवाला यांचे निधन

न्यूयॉर्क: जन्माने जर्मन असलेल्या आणि भारतीय पारशी सायरस झाबवाला यांच्याशी विवाह करून भारतीय बनलेल्या लेखिका रुथ प्रवर झाबवाला यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. श्‍वसनाच्या विकाराने त्यांचे निधन झाल्याचे त्यांचे निकटवर्ती जेम्स आयव्होरी यांनी सांगितले आहे.
त्यांच्या मागे पती सायरस, रिनान्ना, आवा आणि फिरोजाबी अशा तीन मुली आहेत.

जर्मनीतील कलोन येथे ज्यू परिवारात जन्मलेल्या रुथ यांनी सायरस झाबवाला यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांचा मर्चंट आयव्होरी प्रॉडक्शन्स या कंपनीशी अनेकदा संबंध आला. विख्यात ब्रिटिश लेखक ई. एम. फॉस्टर यांच्या कादंबर्‍यांवर आधारित ‘अ रूम विथ अ व्ह्यू’ आणि ‘होवार्डस एंड; या दोन चित्रपटांच्या पटकथा लेखनासाठीरुथ यांना दोन वेळा अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांच्या सदाबहार ‘हिट अ‍ॅण्ड डस्ट’ या कादंबरीला प्रतिष्ठेचा मान बुकर सन्मानही देण्यात आला होता.

राजधानी नवी दिल्लीमध्ये त्यांनी आपल्या आयुष्याचा 25 वर्षांहून अधिक काळ
व्यतीत केला होता. चाळीस वर्षांच्या काळात त्यांनी इस्माईल मर्चंट आणि जेम्स आयव्होरी यांच्यासाठी २० चित्रपट केले.

सन १९३९ मध्ये जर्मन हुकूमशाह अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या छळाला कंटाळून रुथच्या कुटुंबाने जर्मनी देश सोडला. सन १९४८ मध्ये त्यांना ब्रिटनचे नागरिकत्व मिळाले आणि सन १९५१ मध्ये झाबवालांशी विवाहबद्ध होत त्या भारतीय झाल्या. भारतीय संस्कृतीशी त्यांची नाळ इतकी जुळली होती की अनेकांना त्या मूळच्या भारतीयच वाटत. गेली काही वर्षे अमेरिकेत मॅनहटनमध्ये त्या वास्तव्यास होत्या. सन २०११ मध्ये त्यांनी भारताविषयी लिहिलेले ‘अ लव्हसाँग फॉर इंडिया’ हे लघुकथांचे
पुस्तक गाजले होते.

Leave a Comment