पुणे मनपा देणार रंगीत जन्म मृत्यू दाखले

पुणे दि.४ – बनावट जन्म आणि मृत्यू दाखले देण्याच्या घटनांना कायमचा आळा बसावा म्हणून पुणे महानगरपालिकेने आता रंगीत जन्म मृत्यू दाखले देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जन्म दाखला गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या मिश्रणातील कागदांवर तर मृत्यू दाखला निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या मिश्र कागदावर यापुढे दिले जाणार आहेत.

मनसेच्या नगरसेविका प्रिया गदादे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेला जन्मदाखला बनावट असल्याने न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने महापालिकेवरही ताशेरे ओढले होते. जन्म मृत्यू दाखले आरोग्य विभागातर्फे दिले जातात तेथे भ्रष्टाचार होत असल्याचे व बनावट दाखले दिले जात असल्याच्या अनेक तक्रारीही येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या प्रकारांना कायमचा आळा बसावा यासाठी ही योजना आखली गेली आहे. गदादे यांचे नगरसेवकपद रद्द झाले असून त्यांना सात वर्षे निवडणूक लढविण्यास न्यायालयाने बंदी केली आहे.

या विषयी अधिक माहिती देताना आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी रमेश चव्हाण म्हणाले की जन्म मृत्यू दाखले यापूर्वी पांढर्याा कागदावर दिले जात होते मात्र यापुढे विशिष्ट कागदावरच हे दाखले दिले जातील. त्यासाठी दोन रंगाचे मिश्रण करून कागद बनविले गेले असून हे कागद केवळ महापालिकेलाच उपलब्ध केले जाणार आहेत. तसेच सर्व जन्म मृत्यू दाखले केंद्रांनी किती कागद वापरला गेला याची नोंद ठेवायची आहे. त्यामुळे महापालिकेचा खर्च वाढणार असला तरी त्याचा बोजा नागरिकांवर पडणार नाही. पहिल्या प्रतीसाठी २० रूपये व त्यापुढच्या प्रत्येक प्रतीसाठी १० रू. त्यांना द्यावे लागतील. हा कागद विशिष्ठ पद्धतीने बनविला गेला असल्याने त्याची डुप्लिकेट करणे सहज शक्य नाही असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment