दुष्काळी भागात अनेक लग्ने होताहेत रद्द

मुंबई दि. ४- महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील कांही जिल्ह्यात १९७२ पेक्षाही यंदा भीषण दुष्काळ पडला असून या भागात विवाहेच्छुंना आपले दोनचे चार हात करणेही त्यामुळे दुरापास्त बनले असल्याचे वृत्त आहे. पाणीटंचाईने हैराण असलेल्या या भागात आपल्या मुली देण्यास पालक धजावत नसल्याने अनेक लग्ने मोडली आहेत तर काही रद्द करावी लागली आहेत.

जालना जिल्ह्यासारख्या अनेक जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. खायला अन्न नाही, गुरे जगविता येत नाहीत, शेतात धान्य नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सध्या जादा खर्च नको म्हणून विवाह समारंभ न करण्याकडेच ग्रामस्थांचा कल आहे. अगदीच विवाह रद्द करता येत नसेल तर घरच्याघरी टिळा लावण्याचा समारंभ करून विवाह झाल्याचे जाहीर केले जात आहे असेही समजते. तर नव्याने विवाह ठरणार्‍या मुली एकवेळ उपासमार आणि गरीबी चालेल पण पाण्यासाठी वणवण नको अशी अट लग्न ठरविताना घालत आहेत.

वरपालक जसे अडचणीत आले आहेत तीच परिस्थिती वधूपालकांचीही आहे. या भागात ८० टक्के विवाह थांबविले गेले आहेत तर कांही जणांनी विवाह रद्द केले आहेत असे जालन्याचे नगरसेवक अरूण जाधव यांनी सांगितले. मुस्लीम जमातीतही विवाहाबाबत अडचणी असून खर्च वाचविण्यासाठी सामुहिक विवाह समारंभातून अनेक विवाह होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment