मुंबई इंडियन्स सर्वाधिक फेव्हरेट

कोलकाता – इंडियन प्रीमिअर लीगच्या सहाव्या स्पर्धेचे नुकतेच शानदार उदघाटन झाले. त्यामुळे आता दिवसेदिवस आयपीएलमुळे क्रिकेटचा माहोल गरम होणार आहे. या आयपीएल हंगामाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सर्वाना लागली आहे. त्यामुळे याची चर्चा आत्ता पासूनच जोरात रंगली आहे. या चर्चेमध्ये आता माजी कर्णधार सौरव गांगुलीने सुद्धा उडी घेतली आहे.

याबाबत बोलताना माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला,’ अनुभवी कोचिंग स्टाफ आणि अनुभवी खेळाडूंमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या सहाव्या स्पर्धेतसुद्धा मुंबई इंडियन्सची टीम मजबूत दावेदार असणार आहे. माझ्या मते २०१३ मध्ये मुंबईची टीम सर्वाधिक फेव्हरेट असेल. या संघाकडे शानदार कोचिंग स्टाफ आणि बरेच अनुभवी खेळाडू आहेत. यामुळे ही टीम खास आहे.’

मुंबईकडे जॉन राइट सारखा अनुभवी कोच, भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेसारखा मेंटर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पॉटिंगसारखा नेता आहे. याशिवाय मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि हरभजनसिंग सारखे अनुभवी खेळाडूसुद्धा संघाकडे आहेत. इतकेच नव्हे तर ग्लेन मॅक्सवेल, पोलार्ड सारखे युवा आणि अंबाती रायडू व रोहित शर्मा सारखे फलंदाज असल्याने या वेळी ही टीम विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे, असेही गांगुलीने स्पष्ट केले.

Leave a Comment