अॅपलचा ६० इंची टिव्ही या वर्षात येणार

अॅपलच्या अनेक उत्पादनांनी ग्राहकांच्या काळजात ठाण मांडले असतानाच आता अॅपलने ग्राहकांच्या थेट लिव्हिंग रूममध्येही प्रवेश करण्याचा घाट घातला असून अॅपलचा आय टिव्ही याच वर्षात बाजारात दाखल होत असल्याचे वृत्त आहे. अॅपलचा टिव्ही आज ना उद्या येणार हे ग्राहकांना माहिती होते मात्र तो कधी आणि कसा येणार या बाबत मात्र आत्तापर्यंत अनेक तर्क लढविले जात होते. आता या तर्कांना पूर्णविराम मिळणार आहे. अॅपलचा नवा टिव्ही ६० इंच, ५५ इंच आणि ५० इंच स्क्रीनमध्ये उपलब्ध होणार असून त्याची किमत १५०० ते २५०० डॉलर्सच्या दरम्यान असेल.

टोपेका कॅपिटल मार्केटच्या विश्लेषक ब्रेन व्हाईट यांनी अॅपलसाठी सुटे भाग बनविणार्याआ चीनी आणि तैवानी कंपन्यांचा हवाला देऊन अॅपल टिव्ही येत असल्याचे सांगितले आहे. या कंपन्यांतील कांही जणांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांनी ही माहिती मिळविली असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यानुसार अॅपल या टिव्हीसोबत बोटावर घालता येणारी रिंग म्हणजे अंगठीही देणार असून ही रिंग टिव्ही समोर धरून टिव्ही ऑपरेट करता येणार आहे. घरातील अन्य छोट्या टिव्ही स्क्रीनवर या टिव्हीमार्फत व्हिडीओही  पाठविता येणार आहेत असेही त्यांचे म्हणणे आहे.

अॅपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्ज याने त्याच्या आत्मचरित्रकराला टिव्ही बनविण्याची मनीषा असल्याचे मृत्यूपूर्वीच सांगितले होते. हा टिव्ही बाजारात आणून अॅपल स्टीव्हचे स्वप्न पूर्ण करणार आहे.