वादग्रस्त पोलिस अधिकारी वसंत ढोबळेंवर चित्रपट

मुंबई दि.३ – हातात हॉकी स्टीक घेऊन मुंबईच्या नाईट लाइफ जॉईंटवर धाडी आणि अटकसत्र राबविणारे वादग्रस्त पोलिस अधिकारी एसीपी वसंत ढोबळे यांच्यावर चित्रपट निघत असून तो या महिना अखेरी प्रदर्शित होणार असल्याचे समजते. ढोबळेंची भूमिका अरिफ झकारिया हा अभिनेता करणार असून चित्रपटात त्याच्याही हातात कारवाई करताना हॉकी स्टीकच दाखविली गेली आहे.

वसंत ढोबळे यांनी वाकोला विभागात कार्यरत असताना मुंबईच्या श्रीमंत वस्तींतील नाईट क्लब, ज्यूस बार आणि तत्सम केंद्रांवर छापे टाकून अनेक प्रतिष्ठितांनाही अटक केली होती. त्यावेळी ढोबळे पोलिसांच्या सामाजिक विभाग सेवेत होते. हॉकी स्टीकच्या सहाय्याने रात्रीच्या वेळी वेळ संपल्यावरही बारमधून दंगा धुडगुस करणार्‍यांना त्यांनी चांगलाच प्रसाद दिला होता. मात्र मुंबईतील उच्चभ्र लोकांनी त्यांच्या या कृतीला वारंवार आक्षेप घेऊन त्यांची बदली करणे सरकारला भाग पाडले होते.

या संदर्भात एसीपी ढोबळे यांना विचारले असता त्यांनी त्यांच्यावर चित्रपट येतोय याबद्दल कांहीही माहिती नसल्याचे सांगितले. ते म्हणाले  हा चित्रपट मिडीया रिपोर्टवर तयार केला जात असेल तर त्याबाबतच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधील नाही. या चित्रपटातील कांही दृष्यांवर वकीलांनी आक्षेप घेतला असल्याचे समजते मात्र तो अधिकार सेन्सॉर बोर्डाचा असल्याचे चित्रपट निर्मात्याचे म्हणणे आहे. या चित्रपटाचे नांव आहे,- सॅटरडे नाईट.

Leave a Comment