मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर विकण्याची तयारी

मुंबई, दि. २ – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दौर्‍यासाठी खरेदी केलेले कोट्यवधी रुपयांचे ’डाल्फिन एन-३’ हेलिकॉप्टर विकण्याची राज्य सरकारने तयारी केली आहे. यासाठी सरकारतर्फे निविदाही काढण्यात आली आहे. परंतु आर्थिक मंदीत या जुन्या हेलिकॉप्टरला किती किंमत मिळेल याबाबत मात्र अधिकारी साशंक आहेत.

राज्य सरकारच्या हवाई दलात सध्या दोन हेलिकॉप्टर आहेत. त्यापैकी एक असलेल्या  ’डाल्फिन एन-३’ हेलिकॉप्टरने गेल्या वर्षात एकदाही उड्डाण केलेले नाही. व्हीव्हीआयपी दौर्‍यासाठी सरकारने सन २००१ मध्ये यूरोपियन बनावटीच्या या हेलिकॉप्टरसाठी कोट्यवधी रुपये मोजले होते. त्याच्या जोडीला राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी आणखी एक अत्याधुनिक हेलिकॉप्टर खरेदी केले होते.

मागील वर्षांपासून ’डॉल्फिन एन-३’ हेलिकॉप्टर विलेपार्ले येथील हवाईपट्टीवर धूळखात पडले आहे. हे हेलिकॉप्टर ’सिक्स सिटर’ आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ’डॉल्फिन मध्ये बिघाड झाला आहे. परंतु ते दुरुस्त करण्यासाठी खूप खर्च येणार आहे. त्यामुळे हे हेलिकॉप्टर विकून नवे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. या हेलिकॉप्टरने आतापर्यंत केवळ २ हजार ५६ तासाचे उड्डाण केले आहे. त्यामुळे त्यात बिघाड झाला कसा? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात ’डॉल्फिन एन-३’ खरेदी करण्यात आले होते. देशमुखांसह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही अनेक वेळा यातून प्रवास केला होता.

दरम्यान, गडचिरोली व चंद्रपूरसारख्या नक्षली परिसराच्या देखरेखीसाठी ते पोलिसांना सुपूर्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु सुरक्षेच्या कारणावरून पोलिस दलाने त्यास नकार दिला होता. एक महिन्यापूर्वी संबंधित विभागाने हेलिकॉप्टर विक्री करण्याचे टेंडर काढले होते. ’डॉल्फिन एन-३’च्या दुरुस्तीसाठी सुमारे २२ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. दुसरीकडे राज्य सरकारने ६ कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे असे समजते.

Leave a Comment