चीनची विमान खरेदीत आघाडी

चीन हा मोठा देश आहे आणि देशातले नागरिक मोठ्या प्रमाणावर विमान प्रवास करायला लागले आहेत. त्यामुळे जगभरातून चीन अनेक विमाने मागवत आहे. अमेरिकेतल्या बोर्ईग कंपनीची 999 विमाने आजवर चीनने खरेदी केली होती. आता एक हजाराव्या विमानाची खरेदी करण्यात आली असून चीन हे या कंपनीचे सर्वात मोठे गिर्‍हाईक ठरले आहे. आजवर अमेरिकेकडे जगातल्या कोणत्याही देशाने 1 हजार बोइंग विमानांची खरेदी केलेली नाही. बोइंगसाठी चीन हे सर्वात मोठे आणि आकर्षक गिर्‍हाईक ठरले आहे.

या विक्रमी विमानाची डिलेव्हरी देण्यासाठी या कंपनीच्या ईशान्य आशिया विभागाच्या विक्री विभागाचे प्रमुख ल्हास्सान मोनीर हे स्वत: हजर होते. हे हजारावे विमान चीनमधील ईस्टर्न यूनान एअरलाइन्स या प्रवासी विमान कंपनीच्या विमानांच्या ताफ्यात सामील होणार आहे. हे विमान बीजिंग विमानतळावर दाखल झाले असून ते लवकरच यूनानकडे रवान होणार आहे. तिथे या विमान कंपनीचे सरव्यवस्थापक शी फुकांग या विमानाचे स्वागत करतील. हे विमान बोइंगच्या नव्या पिढीतल्या विमानांपैकी असून त्याचे मॉडेल 737 मॉडेल म्हणून ओळखले जात आहे. या विमानाचे कॉकपिट आणि मागील प्रवाशांच्या आसनाच्या ओळी यांत एक काचेचे पार्टीशन टाकण्यात आले आहे. या पार्टीशनमधून पायलटला मागच्या बाजूची सारी माहिती नजरेच्या एका कटाक्षात प्राप्त होईल.

चीन हे जगातले विमानांचे मोठे आणि विक्रमी ग्राहक झाले आहे. प्रवासी आणि मालवाहू अशा दोन्ही प्रकारच्या विमानांना या देशात मोठी मागणी आहे. येत्या 20 वर्षात चीनला पाच हजार 260 विमानांची गरज भासणार आहे. त्यांची किंमत आजच्या परिस्थितीनुसार 670 अब्ज डॉलर्स असेल. चीनची ही गरज भागवण्याबाबत बोइंग कंपनीने नेहमीच पुढाकार घेतला आहे. 1916 पासून या दोघांचे संबंध आहेत. त्यावेळी पहिले बोइंग विमान भाड्याने घेणारा इंजिनियर चिनी होता आणि त्याचे नाव वाँग त्सु असे होते. याच अभियंत्याने कंपनीच्या पहिल्या सी बी विंग या बनावटीच्या विमानाचे म्हणजे पहिल्या मालवाहू विमानाचे डिझाईन तयार केले होते. 1972 साली अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनला भेट दिली तेव्हा त्यांनी पहिले बोइंग व्यापारी विमान चीनच्या खाजगी कंपनीला विकण्याचा करार केला. या विमानांचे अनेक सुटे भाग चीनमध्ये तयार होतात. जगभरात या कंपनीची 7000 विमाने हवेत असतात. त्यातली एक हजार विमाने एकट्या चीनमध्ये आहेत.

Leave a Comment