उत्तरपूर्व सीमेवर चीनचे लष्कर सज्ज

बिजिग दि.३ – उत्तर कोरियाने अमेरिकेवर हल्ला करण्याची दिलेली धमकी आणि दक्षिण कोरियावर क्षेपणास्त्रे डागण्याची चालविलेली तयारी याची गंभीर दखल घेऊन उत्तर कोरियाजवळील उत्तरपूर्व भागात चीनने लष्कराच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कोरियन देशांतील वाढता तणाव कधीही युद्धात परावर्तित होऊ शकतो अशावेळी आपली सीमा सुरक्षित करण्यासाठी चीनने ही उपाययोजना केली असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात मार्चच्या मध्यापासूनच चीनने लष्कराच्या तुकड्या हलविण्याची सुरवात केली असून त्याची माहिती उत्तर कोरियाला दिली गेली आहे असेही सांगण्यात येत आहे.

गेल्या कांही दिवसांत चीनने युद्धसरावही सुरू केला असून त्यांच्या नौदलाने युद्धनौकांच्या कवायती आणि फायरिंग सराव पिवळ्या समुद्रात सुरू केला आहे आहे. त्याला उत्तर कोरियाने सहमती दर्शविली आहे . मात्र एप्रिलपासून सुरू होत असलेल्या दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या संयुक्त युद्धसरावाला मात्र उत्तर कोरियाने आक्षेप घेतला असून अमेरिकेच्या लष्करी ठाण्यांवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे.

उत्तर कोरियानेही त्यांची लघु आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे मोक्याच्या ठिकाणी हलविण्याचे काम सुरू केले असून सॅटेलाईट इमेजिंगच्या सहाय्याने या हालचाली टिपल्या जात असल्याचेही समजते.

Leave a Comment