महाराष्ट्रातील फिनोलेक्स उद्योग आता गुजरातेतहि

पुणे दि ३ : देशातील उद्योगांचे मित्र मानले गेलेले नरेंद्र मोदी यांच्या सरकारने रेड कार्पेट वागणूक दिल्याने महाराष्ट्रातील आणखी एक मोठा उद्योग आता गुजरातेत गेला आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीजने बडोद्याजवळ मसार येथे १०० कोटी रुपये खर्चून पीव्हीसी पाईप उत्पादन प्रकल्प उभारला असून नरेंद्र मोदी सरकारने दिलेल्या सवलतींमुळे प्रथमच महाराष्ट्राबाहेर गुंतवणूक करण्यात आल्याचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश छाब्रिया आज येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. कंपनीचे महाराष्ट्रात पुणे आणि रत्नागिरी असे दोन प्रकल्प आहेत आणि गुजरातचा तिसरा आहे. यानंतरच्या विस्तारासाठी गुजरात किंवा नागपूरचा विचार केला जाईल असेही सांगितले

व्हायब्रंट गुजरात परिषदेवेळी झालेल्या करारानुसार मसारचा प्रकल्प उभारण्यात आला आहे अशी माहिती देऊन ते म्हणाले की यामुळे उत्पादन क्षमतेत प्रतिवर्ष ३० हजार टन भर पडणार आहे. दुसरा टप्पा पूर्ण झाल्यावर ती ५० हजार टन होईल. यामुळे तिन्ही प्रकल्पाची क्षमता दोन लाख टन होणार आहे. भारताची बाजारपेठ आणि विक्री पश्चात सेवा आम्ही नागपूरचा विचार करत आहोत. मार्च २०१२ अखेर उलाढाल २१०० कोटी रुपये झाली आहे. कच्च्या मालाबाबत कंपनी स्वयंपूर्ण झाल्याचेही यांनी नमूद केले. रेझिन उत्पादनातही कंपनीचा दुसरा क्रमांक आहे.

मंदीचा आमच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही मात्र युरोपमध्ये तो अधिक जाणवतो आहे. २०१४ नंतर परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे असेही त्यांनी सांगितले. कृषी घरबांधणी दूरसंचार या क्षेत्रात पीव्हीसी पाईपचा मुख्यत्वे वापर केला जातो.

Leave a Comment