नवी दिल्ली- गेल्या काही दिवसापूर्वी काही स्पर्धा झाल्या मात्र टीम इंडियातील अनेक खेळाडू जायबंदी झालाल्याने खेळू शकले नाहीत. मात्र हेच खेळाडू आता आयपीएल सुरू होण्याच्या सुमारास फिट झाले आहेत. टीम इंडियाचे झहीर खान, मनोज तिवारी, आशिष नेहरा, उमेश यादव, इरफान पठाण हे अनफिट खेळाडू आयपीएल सुरू होण्याच्या सुमारास फिट होऊन मैदानात उतरले आहेत.
आयपीएलमुळे अनेक खेळाडू झाले फिट
हे खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी म्हणून विश्रांती घेऊन फिटनेस कायम राखला की योगायोगाने ते टी-२० चा थरार सुरू होण्याच्या सुमारास फिट झाले हे मात्र रहस्यच आहे. काहींच्या मते खेळाडू पैशांसाठी करिअर पणाला लावत आहेत. तर काही म्हणतात मैदानाबाहेर असलेले खेळाडू आयपीएलच्या निमित्ताने स्वतःच्या क्षमतेची चाचपणी करुन घेत आहेत.
आयपीएलच्या गेल्या हंगामात अनफिट सेहवाग मैदानात उतरला आणि दुखापत झाल्यामुळे आणखी काही दिवस मैदानाबाहेर गेला होता. त्यामुळे टीम इंडियासाठी खेळणा-या खेळाडूंनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा असे तज्ज्ञांचे मत आहे. पण खेळाडूंनी अशा मतांकडे दुर्लक्ष करुन आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेला झहीर खान आयपीएलच्या निमित्ताने पुन्हा एकदा मैदानावर येत आहे. अनफिट झाल्यामुळे त्याला काही महत्त्वाच्या स्पर्धांना मुकावे लागले होते. झहीर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्यावतीने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी कसून सराव करत आहे.
वारंवार दुखापतींमुळे मैदानाबाहेर राहणारा आशिष नेहरा दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापत झाल्यामुळे टीम इंडियातून आऊट झालेला उमेश यादव आपल्या गोलंदाजीचे कौशल्य आयपीएलच्या निमित्ताने पणाला लावणार आहे. तो दिल्लीकडून खेळणार आहे. इरफान पठाणसुद्धा दिल्लीकडून खेळून स्वतःच्या क्षमतेची चाचपणी करणार आहे. मनोज तिवारी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहे.