विधानभवनाजवळ नक्षली दोघांची शरणागती

मुंबई, दि.2- महाराष्ट्र एटीएसने नक्षलवादी म्हणून घोषित केलेले शीतल
साठे आणि सचिन माळी हे आज विधानभवनाजवळ पोलिसांना शरण आले. यावेळी
त्यांना पाठिंबा देण्यासाठी डाव्या चळवळीतले कार्यकर्ते त्यांच्यासोबत
उपस्थित होते.
कबीर कला मंचचे कलावंत शीतल साठे आणि सचिन माळी यांच्यावर नक्षलवाद्यांना
मदत केल्याचा आरोप आहे. दोघेही कलावंत गेल्या दीड वर्षांपासून भूमिगत
होते. पोलिस त्यांच्या मागावर होते.
ही शरणागती सत्याग्रह असल्याचा दावा या दोघानांही केला आहे. आपली बाजू
मांडण्याची संधी मिळावी, यासाठी आपण हा सत्याग्रह केल्याचेही त्यांनी
म्हटले आहे.
शीतल 2002 मध्ये अमरनाथ चंदेलियाच्या कबीर मंचमध्ये सामील झाल्या होत्या.
हा मंच विविध सामाजिक मुद्द्यांवर आवाज उठवतो. पण ही संघटना सध्या
पोलिसांच्या रडारवर आहे. ही नक्षलवाद्यांची संघटना असल्याचं महाराष्ट्र
एटीएसचे म्हणणे आहे. शिवाय ते नक्षलवाद्यांना मदत करतात, असेही पोलिस
सांगतात.
तर गरीबांच्या हक्कासाठी लढल्यामुळे, एसईझेड (सेझ)आणि बिल्डरांविरोधात
आवाज उठवल्यामुळे सरकार हादरले आहे. त्यामुळेच या मंचाला नक्षलवाद्यांची
संघटना असल्याचं म्हटले जात आहे, असे कबीर कला मंचच्या कलावंतांचे म्हणणे
आहे.
सर्वात आधी कबीर कला मंचचे सदस्य सिद्धार्थ भोसले आणि दीपक डेंगळे यांना
अटक करण्यात आली होती. दलित मुला-मुलींची ही संघटना आंबडेकरी आणि
ज्योतिबा फुलेंचे विचार गीत-नाटकांद्वारे गावागावात पोहोचवत असत.मात्र या
संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांचा संबंध नक्षलवाद्यांसोबत आहे. त्यांच्याच
जबानीवरुन ते नक्षली असल्याचा दावा केल्याचे एटीएसतर्फे सांगण्यात आलं
आहे.
एटीएसच्या माहितीनुसार, शीतल आणि त्यांच्या साथीदारांवर लोकांना
भडकवण्याचे आणि नक्षली क्रांतिकारकांच्या गोष्टी सांगण्याचा आरोप आहे.
शीतल बर्‍याचदा भगतसिंग यांच्या गोष्टी सांगतात. तसंच डॉ. बाबासाहेब
आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि अण्णाभाऊ साठे हे त्यांचा आदर्श असल्याचेही
त्यांनी सांगितले.
………………………………………………………………………

Leave a Comment