पाकिस्तानी आदिवासी महिला रचणार इतिहास

इस्लामाबाद दि.२ – पाकिस्तानातील अशांत समजल्या जाणार्याा पश्चिमोत्तर भागातून दोन आदिवासी महिला मे महिन्यात होत असलेली सार्वत्रिक निवडणूक उमेदवार म्हणून लढविणार आहेत. या भागातून आदिवासी महिला निवडणूक रिंगणात देशाच्या इतिहासात प्रथमच उतरत असून हा नवा इतिहास त्या रचणार आहेत. पाकिस्तानात ११ मे रोजी निवडणूका होत आहेत.

चाळीस वर्षीय बदाम जरी या बाजौर भागातून निवडणूक लढविणार आहेत तर नूसरत बेगम या खैबर पख्तून भागातून निवडणूक रिंगणात उतरत आहेत. खैबर पख्तून भागातून राजकारणात महिलांचा सहभाग वाढताना दिसून येत असला तरी परंपरावादी कबीलाई भागातून म्हणजे बाजौरमधून आजपर्यंत एकही महिला निवडणूक रिंगणात उतरलेली नाही. येथील महिलांना बरेचवेळा मतदानापासूनही वंचित राहावे लागते कारण या भागात अनेक दहशतवादी संघटना कार्यरत आहेत.

आपला निवडणूक अर्ज सोमवारी दाखल केल्यानंतर बोलताना बदाम जरी म्हणाल्या की या भागातील महिलांचे प्रश्न आजपर्यंत येथून निवडून गेलेल्या कोणत्याच उमेदवाराने कधीच हाताळलेले नाहीत. त्यामुळे आपण महिला कल्याणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच निवडणूक लढविणार आहोत.

Leave a Comment