जादूटोणा विधेयकासाठी अनिसचे आत्मक्लेश उपोषण

पुणे,दि.2-जादूटोणाविधेयकास दि.10 एप्रिलपूर्वी प्रतिसाद न मिळाल्यास चार दिवसांचे आत्मक्लेश उपोषण करण्याचा इशारा अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
मुख्यमंत्र्याकडून ठोस कृती केली जात नसून यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत्या 11 ते 14 एप्रिल दरम्यान आत्मक्लेष उपोषण करण्यात येणार आहे. त्यानंतर 16 एप्रिल रोजी आझाद मैदानावर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. कायदा होण्याबाबतची अनेक निवेदने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली असून वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींसमवेत बोलून त्यांच्या मागण्यांप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कायदा आणखी सौम्य केला आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तो मंजूर होईल, असे अधिवेशनापूर्वी झालेल्या वार्तालापात त्यांनी जाहीर केले होते. हा कायदा गेली 14 वर्षे झाली प्रलंबित आहे. या अधिवेशनात हा कायदा होणे पूर्वीपेक्षा अवघड आहे. वारकरी संप्रदायाच्या सूचनेप्रमाणे बदललेला कायदा अजून मंत्रीमंडळासमोरही आलेला नाही. त्यानंतर तो कायदा विभागाकडून शब्दांकित होवून गृहखात्याचे ‘ना हरकत’ पत्र घेवून मगच तो सामाजिक न्यायमंत्र्यांना पुन्हा विधानसभेत मांडावा लागणार आहे. कामकाज पत्रिकेत प्रलंबित कायदा दाखवला आहे, तो जुलै 2011 मध्ये मांडलेला आहे. कायद्यातील बदलामुळे तो आपोआपच रद्दबातल ठरणार आहे. कायदा दोन्ही सभागृहात मंजूर करुन घेणे ही त्यापुढची बाब आहे. यासाठी शासनाकडे फक्त 18 दिवस आहेत. शासनाने कार्यक्षमता दाखवल्यास हे घडू शकते. समिती यासाठी गेली तीन महिने प्रयत्न करीत आहे. मात्र, अद्याप त्यावर ठोस पाऊल उचलले गेले नाही, अशी खंतही दाभोळकर यांनी बोलून दाखविली.

Leave a Comment