अबू जुंदालची आमरण उपोषणाची धमकी

मुंबई दि.२ – लष्करे तैय्यबाचा संशयित दहशतवादी आणि मुंबईवरील २६/११ च्या हल्याचा मुख्य सूत्रधार अबु जुंदाल याने त्याला एकांतवासातून बाहेर काढले नाही तर आमरण उपोषण करण्याची धमकी दिली असून तसे पत्रच त्याने त्याला सध्या ठेवलेल्या ऑर्थर रोड कारागृह अधिकार्‍यांना दिले आहे. हे पत्र या अधिकार्‍यांनी मोक्का न्यायालयाला सादर केले असून त्यावर आज निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अबु जुंदालवर मोक्का न्यायालयात औरंगाबाद शस्त्रास्त्रे प्रकरणी केस सुरू आहे. तो सध्या ऑर्थर रोड तुरूंगात असून त्याने त्याला अन्य कैद्यांसोबत मिसळू दिले जात नाही. बोलू दिले जात नाही अशी तक्रार केली आहे. परिणामी तो एकटा पडला आहे. त्यामुळे त्याचा हा बंधनकारक एकांतवास संपविला नाही तर आपण आमरण उपोषण करणार असल्याचे तुरूंगाधिकार्‍यांना २८ मार्च रोजीच पत्र लिहून कळविले आहे.

औरंगाबाद येथे २००६ साली सापडलेल्या अवैध शस्त्रसाठ्याच्या तपासात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने २२ जणांना अटक करून ३० किलो आरडीएक्स, १० अेके ४७ व ३२०० काडतुसे जप्त केली होती. त्यावेळी टाटा सुमो आणि इंडिका गाड्यातून पळून जात असलेल्यांचा पाठलाग करून पोलिसांनी हा ऐवज जप्त केला होता मात्र जुंदाल त्यावेळी इंडिका चालवत होता आणि पोलिसांना चकवून पळून जाण्यात तो यशस्वी झाला होता. त्यानंतर मालेगांव येथे एका ओळखीच्या इसमाकडे जुंदालने गाडी सोपविली होती आणि बनावट पासपोर्टवर तो बांग्ला देशातून पाकिस्तानात पळून गेला होता.

Leave a Comment