नवी दिल्ली, दि. 1 – ‘अतिथी देवो भव’ची संस्कृती सांगणार्या भारतात गेल्या काही काळात विदेशी महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्यामुळे त्यांनी भारताकडे पाठ फिरवली आहे. गेल्या तीन महिन्यांत भारतात येणार्या या विदेशी महिला पर्यटकांच्या संख्येत सुमारे 35 टक्के घट झाल्याचे एका संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत मागील वर्षाच्या शेवटी 23 वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतरही अशा घटना सुरूच राहिल्या. गेल्या महिन्यात भारत दौर्यावर आलेल्या स्वित्झर्लंडच्या महिलेवर मध्य प्रदेशात पतीदेखत सामूहिक बलात्कार करण्यात आला. जानेवारीत याच राज्यात दक्षिण कोरियाच्या महिलेवर अंमली पदार्थ देऊन ही महिला उतरलेल्या हॉटेलच्या मालकाच्या मुलाने बलात्कार केला.
अशा घटनांमुळे विदेशी महिला पर्यटकांत दहशत निर्माण झाली आहे, असे असोचेम या उद्योजकांच्या संघटनेने म्हटले आहे. संघटनेने देशातील विविध शहरांतील एक हजार 200 पर्यटन व्यावसायिकांच्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढला आहे. भारताकडे विदेशी पर्यटकांचा ओढा वाढत असल्याच्या पर्यटन मंत्रालयाच्या अहवालाशी मात्र हा अहवाल विसंगत आहे. अर्थात मंत्रालयाने मार्चअखेरची आकडेवारी अजून जाहीर केलेली नाही. भारतातील स्थिती पाहता विविध देशांनी आपल्या नागरिकांना भारतात जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.