राहुल गांधींच्या नव्या आदेशाने नेते अडचणीत

नवी दिल्ली – कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी नवा आदेश काढला आहे. त्यामुळे नेते अडचणीत आले आहेत. आता काँग्रेसच्या उमेदवार व शिफारस करणार्‍याला काळजी घ्यावी लागणार आहे. निवडणुकीत पराभूत झाल्यास उमेदावरची व शिफारस करणार्‍या नेत्याची खुर्चीही धोक्यात येऊ शकते.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत एक प्रपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या चार कॉलममध्ये उमेदवार, मतदारसंघ आणि शिफारस करणार्‍या नेत्याच्या नावाचा कॉलम असून निवडणुकीच्या निकालानंतर उमेदवारीची शिफारस करणार्‍या नेत्याच्या भवितव्याचा फैसला करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आगमी काळात शिफारस करणे महागात पडणार आहे.

गेल्या काही दिवसपासून राहुल गांधींनी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काँग्रेस समितीने उमेदवारी कोणालाही द्यावी, मात्र त्या उमेदवाराच्या नावाची शिफारस करणार्‍या नेत्याची जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी शिफारस करणार्‍या नेत्यांवरच सोपवण्यात आली आहे. निवडणुकीत उमेदवाराचा पराभव झाला तर त्याला मिळालेल्या मतांच्या फरकानुसार शिफारस करणार्‍या नेत्यांच्या भवितव्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. नेता कितीही मोठा असला तरी त्याने शिफारस केलेल्या उमेदवांपैकी अर्धेअधिक उमेदवार पराभूत झाले तर त्या नेत्यावर गंडांतर येऊ शकते. भविष्यात त्याच्या शिफारशीला काडीची किंमत दिली जाणार तर नाहीच, शिवाय त्याच्याकडे सध्या असलेले पदही काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेतेमंडळी धास्तावली आहे.

Leave a Comment