केरळच्या त्या मंत्र्याचा राजीनामा

थिरुवनंतपुरम, दि.2 – अनैतिक संबंध आणि पत्नीला मारहाण करण्याचे आरोप
असलेले केरळचे वनमंत्री के.बी. गणेशकुमार यांच्या विरोधात विरोधकांनी
केरळ विधानसभेत गोंधळ घातला. प्रकरण चव्हाट्यावर आल्याने गणेशकुमार यांनी
सोमवारी रात्री उशीरा मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचे मुख्यमंत्री
ओमन चांडी यांनी सांगितले. मात्र मुख्यमंत्री हे गणेशकुमार यांच्याबाबत
नरमाईची भूमिका घेत असल्याचा आरोप करत याप्रकरणी सभागृहात चर्चा करण्याची
मागणी विरोधकांनी लावून धरली. याप्रकरणी शुन्य प्रहरात चर्चा करण्यात
येईल, असे सभापती जी. कार्तिकेयन यांनी सांगितले. मात्र तरीही विरोधक
शांत होत नसल्याने सभापतींनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दोन वेळा दहा
मिनिटांसाठी सभागृह स्थगित केले.

गणेशकुमार यांच्यावर त्यांची पत्नी डॉ. यामिनी थांकची यांनी घरगुती
हिंसाचाराचे आणि दुसर्‍या स्त्रीशी अनैतिक संबंध असल्याचे गंभीर आरोप
केले आहेत. गणेश कुमार यांनी मात्र यामिनी यांनी केलेले आरोप फेटाळून
लावत यामिनी आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा केला.

गणेशकुमार यांनी आपले केस पकडून आपल्याला मारहाण केल्याचे यामिनी यांनी
म्हटले आहे. तसेच गेल्या 16 वर्षांपासून आपण घरगुती हिंसाचाराला बळी पडत
असल्याचे यामिनी यांनी सांगितले. त्यांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज
दाखल केला असून मारहाणीनंतर झालेल्या जखमांची छायाचित्रेही त्यांनी
न्यायालयात सादर केली. तर दुसरीकडे, मंगळवारी सकाळी गणेशकुमार यांनी
पत्नीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच पत्नी यामिनी हिनेच
22 फेब्रुवारी रोजी रात्री आपल्याला कर्मचार्‍यांसमक्ष मारहाण केली, असे
गणेशकुमार यांनी न्यायालयात सांगितले. शरीरावरील व्रणांचे छायाचित्रही
त्यांनी प्रसार माध्यमांना दाखवले.

राजकीय विरोधकांच्या चिथावणीवरून यामिनी आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा
आरोप गणेशकुमार यांनी केला आहे. हा आपल्या विरोधात रचलेला राजकीय डाव
आहे. सत्य काय आहे ते लवकरच समोर येईल, असे ते म्हणाले.
गणेशकुमार व यामिनी यांच्या घटस्फोटावर 28 एप्रिल रोजी सुनावणी होणार
आहे. दोघांच्या लग्नाला 14 वर्षे झाली असून त्यांना एक मुलगा व मुलगी अशी
दोन मुले आहेत.

या प्रकरणाचा गुंता वाढत चालल्याने, मुख्यमंत्री ओमन चांडी यांनी आपले
वरीष्ठ सहकारी मंत्री के. एम. मणी, पी. के. कुन्हालीकुट्टी आणि
केपीसीसीचे अध्यक्ष रमेश चेन्नीथला यांच्याशी सोमवारी रात्री चर्चा केली.
या बैठकीला पोलिस महासंचालक के. एस. बालसुब्रमण्यम यांनाही बोलावले होते.
त्यानंतर रात्री साडेदहा वाजता कामगार मंत्री शिबु बेबी जॉन हे गणेशकुमार
यांच्या निवासस्थानी गेले. शिबु यांनी गणेशकुमार यांच्याकडून राजीनामा
लिहून घेतला आणि रात्री साडेअकरा वाजता मुख्यमंत्री ओमन चांडी यांच्याकडे
सुपूर्द केला. मुख्यमंत्री ओमन चांडी मंगळवारी हा राजीनामा राज्यपालांकडे
सुपूर्द करणार आहेत.

Leave a Comment