वॉशिंग्टन दि. २ – अॅपल, सॅमसंग आणि गुगल या कंपन्या ग्राहकांना प्रतीक्षा असलेली स्मार्ट घड्याळे याच वर्षात बाजारात आणणार असल्याचे ग्राहक उपकरणे विश्लेषणाचे काम करणार्याा संशोधन संस्थेने म्हटले असून २०१३ या वर्षअखेरीपर्यंत ही घड्याळे बाजारात दाखल होतील असा अंदाजही वर्तविला आहे.
विश्लेषकांच्या म्हणण्याप्रमाणे २०१३ हे वर्षच स्मार्ट घड्याळांचे वर्ष असेल. कारण अशा प्रकारच्या घड्याळांसाठी लागणारी यंत्रे लहान आकारात बनविणे शक्य झाले आहे आणि तुलनेने ती स्वस्तही आहेत. त्यामुळे स्मार्टफोन या घड्याळांना जोडणे ग्राहकाला सहज शक्य होणार आहे. ही संकल्पना तशी दशकापूर्वीची आहे आणि मायक्रोसॉफ्टने असे एक वॉच २००३ सालात तयारही केले होते.
आजही सोनीसह पेबल व इटालियन फर्म आय अॅम यांची अशी घड्याळे बाजारात आहेत. ही घड्याळे ग्राहकांत नक्कीच लोकप्रिय होतील आणि स्मार्टफोन युजरची वाढती संख्या पाहता या घड्याळांची बाजारपेठही २०१८ सालापर्यंत वर्षाला ६ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल असाही अंदाज या विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. या व्यवसायात नफ्याचे प्रमाणही चांगले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.